दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर

    दिनांक :24-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Parliament Ratna Award 2026 संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. राज्यातील पाच खासदारांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यात दोन महिला खासदारांचाही समावेश आहे. संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, चर्चांमधील उपस्थिती, प्रश्नोत्तरांतील योगदान आणि विविध विषयांवरील मांडणी याच्या आधारे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 

dfhy 
यंदा लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, नरेश गणपत म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ तसेच पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वैयक्तिक श्रेणीतील या निवडीमुळे महाराष्ट्राच्या संसदीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेतील कामगिरीचा सविस्तर आढावा घेऊन ज्युरी समितीने या पुरस्कारांसाठी १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. संसदेतील शिस्तबद्ध सहभाग, विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणी आणि लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण भूमिका या निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांची घोषणा करताना भाजप खासदार स्मिता उदय वाघ यांच्या कार्यनिष्ठेचे विशेष कौतुक करण्यात आले. त्या सध्या कर्करोगाशी झुंज देत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. केमोथेरपीचे सत्र पूर्ण करून त्या संसदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहत असल्याचे सांगत समितीने त्यांच्या जिद्दीचा आणि कर्तव्यभावनेचा गौरव केला.
महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर राज्यांतील अनेक मान्यवर खासदारांनाही संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे, उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल, झारखंडचे विद्युत बरन महतो तसेच राजस्थानचे लुम्बाराम चौधरी यांचा यात समावेश आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री डॉ. चरणजितसिंग चन्नी आणि गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.यंदा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चार संसदीय स्थायी समित्यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कृषी समिती, वित्त समिती, ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती तसेच कोळसा आणि खाण समिती यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.दरम्यान, संसद रत्न पुरस्काराचा १६वा सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षांत एकूण १४३ पुरस्कार प्रदान करण्यात आले असून यंदाच्या सोहळ्यात १५०वा संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नागरी समाजाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार संसदेतील प्रभावी आणि लोकाभिमुख कामगिरीसाठी दिला जातो. यंदाच्या सर्व विजेत्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहितीही समितीकडून देण्यात आली आहे.