‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना कायम

    दिनांक :24-May-2026
Total Views |
मुंबई
Raja Shivaji अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि मुख्य भूमिकेत असलेल्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर 23 दिवस उलटूनही चित्रपटाची कमाई स्थिर असून प्रेक्षकांचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चित्रपटगृहांबाहेर अजूनही गर्दी पाहायला मिळत आहे.
 

Raja Shivaji 
चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात सुमारे 52.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यातही हा वेग कायम राहून 24.30 कोटी रुपयांची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने स्थिर कामगिरी करत 22 व्या दिवशी सुमारे 70 लाख रुपयांची कमाई केली, तर 23 व्या दिवशी 1.37 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या आकडेवारीनुसार ‘राजा शिवाजी’ची एकूण कमाई आतापर्यंत 90.77 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
 
 
मराठी आणि हिंदी अशा Raja Shivaji दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी आवृत्तीत अधिक मजबूत कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ‘राजा शिवाजी’ने मागे टाकल्याचेही समोर आले आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत असून तो मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रितेश देशमुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, हा चित्रपट तयार करण्यासाठी त्याला जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित या भव्य चित्रपटात रितेशने स्वतः महाराजांची भूमिका साकारली आहे.या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, बोमन इराणी आणि जितेंद्र जोशी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली आहे.सतत वाढत असलेली कमाई आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता ‘राजा शिवाजी’चा प्रवास पुढील दिवसांत कोणता नवा टप्पा गाठतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे.