पहिला दगड मारण्याआधी

    दिनांक :24-May-2026
Total Views |
रोखठोक. . .
 
दिनेश गुणे
society is sensitive कोणत्याही जीवनशैलीची एक चौकट असते. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि व्यवस्था हे त्या चौकटीचे कोन असतात. यामुळे जीवनशैली परिपूर्ण होते. कोणताही समाज व्यक्ती आणि कुटुंबाविना पूर्ण होत नाही. समाज म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबांचा समूह असतो आणि जीवनशैलीची घडी विस्कटू नये याकरिता या समूहातूनच व्यवस्था निर्माण केली जाते. म्हणजेच, व्यवस्था आणि समाज या भिन्न बाबी नाहीत. व्यवस्था हादेखील समाजाचाच एक भाग असतो आणि समाजातूनच व्यवस्थेची उभारणी केली जात असते. जेव्हा समाज व्यवस्थेवर नाराज होतो, व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू लागतो, तेव्हा मात्र, समाज आणि व्यवस्था यांचे अस्तित्व वेगळे असल्याचा संभ्रम निर्माण होतो. समाज हा संवेदनशील असतो. अन्याय, अत्याचार, व्यभिचार, भ्रष्टाचार या बाबी समाजास सहन होत नाहीत. तरीही, हजारो वर्षांपासून अन्याय, अत्याचार होतच राहिले आहेत आणि या बाबींच्या विरोधातील समाजाची संवेदनशीलताही उघड होत गेली आहे. म्हणूनच, येशू ख्रिस्ताच्या काळातील हजारो वर्षांपूर्वीच्या, बायबलमधील त्या कथेचा संदर्भ आजही दिला जातो. त्या काळातील समाजातही व्यभिचार, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार होत होते आणि तेव्हाही संवेदनशील समाज त्याविरुद्ध पेटून उठत होता. बायबलमधील ती प्रसिद्ध बोधकथा हे त्याचेच उदाहरण आहे. एका महिलेवर व्यभिचाराचा आरोप होतो, तेव्हा समाजात प्रचंड संताप प्रकट होतो.
 

society is sensitive 
 
 
त्या महिलेस भर चौकात शिक्षा करावी असे ठरते आणि दगडांनी ठेचून मारण्यासाठी तिला चौकात आणले जाते. व्यभिचारी महिलेस होणाऱ्या शिक्षेची कार्यवाही पाहण्यासाठी लोकांची चौकात गर्दी होते आणि गर्दीतील प्रत्येक जण हातात दगड घेऊन शिक्षेच्या कार्यवाहीचे भागीदार होण्यासाठी उभा राहतो. अशा व्यभिचारी महिलेस शिक्षा देण्याची समाजाची मानसिकता म्हणजे, एक प्रकारे संवेदनशील समाजाचा व्यभिचाराविरुद्धचा संतापच असतो. पुढच्या काही क्षणांत शिक्षेची कार्यवाही सुरू होणार असते. प्रत्येक जण आपल्या हातातील दगड उंचावतो, तेवढ्यात गर्दीतून येशूचा आवाज येतो, ‘‘ज्याने आयुष्यात कोणतेच पाप केलेले नाही, त्याने पहिला दगड मारावा!’’ उंचावलेले हात खाली येतात, गर्दीतील संवेदनशील माणसांच्या माना लाजेने खाली जातात आणि बघता बघता गर्दी पांगते. लोक घरी परततात.
 
शिक्षा देणारी व्यवस्था आणि समाज यांची दोन रूपे या कथेच्या निमित्ताने आजही स्पष्ट दिसतात. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील एका गावात सुट्टीच्या निमित्ताने मामाच्या घरी गेलेल्या साडेतीन वर्षांच्या एका चिमुरडीला गोठ्यातले गायीचे वासरू दाखवतो म्हणून आडोशाला घेऊन गेलेल्या भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षांच्या वृद्धाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि तिला ठार मारून तिचा देह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपविला. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर तिचा शोध सुरू झाला आणि ती सापडली नाही तेव्हा गावकरी व्यवस्थेच्या विरोधात संतापाने पेटून उठले. गावात असंतोष खदखदू लागला. ग्रामस्थांनी स्वतःच शोधमोहीम सुरू केली आणि तो भीमराव कांबळेदेखील गावकऱ्यांच्या शोधमोहिमेत सहभागी होऊन मुलीला शोधण्याचे नाटक करू लागला. आपणच गुन्हा केला आहे असा संशय येऊ नये म्हणून गर्दीत वावरताना तो लोकांना उलटसुलट माहिती देऊन व संशयास्पद उत्तरे देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. आपला संशय येऊ नये म्हणून तो अत्यंत शांत आणि सामान्य राहून समाजाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळेच संशयाची सुई त्याच्याकडे वळली. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमुळे तो संशय पक्का झाला आणि भीमराव कांबळेचा मुखवटा उतरला. तोपर्यंत तो संवेदनशील समाजाचा एक भाग म्हणून वावरत होता. मुलीचा शोध घेणाऱ्या व्यवस्थेचा भाग म्हणून त्यामध्येही तो शहाजोगपणे सहभागी झाला होता. पण तोच आरोपी आहे हे स्पष्टपणे उघडकीस आले, तेव्हा तो व्यवस्थेच्या आणि समाजाच्या दुसऱ्या बाजूचा भाग झाला.
 
व्यवस्था आणि समाज यांचे वेगळेपण हे असे असते. जेव्हा कोणतीही व्यक्ती समाजाचा भाग म्हणून वावरत असते, तेव्हा ती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उंचावते, अन्यायाविरुद्ध दंड थोपटून समाजाच्या असंतोषाचा भाग बनते, पण तीच व्यक्ती जेव्हा समाजातून बाहेर पडून व्यवस्थेच्या खुर्चीवर बसते, तेव्हा समाजाच्या असंतोषाचे लक्ष्य बनते. म्हणजेच, ज्या व्यवस्थेच्या विरोधात समाज नेहमी पेटून उठतो, कोणत्याही अन्याय, अत्याचाराविरोधात व्यवस्थेस जाब विचारतो, ती व्यवस्था म्हणजे समाजाचीच दुसरी बाजू असते.
 
ज्याने कधीच पाप केले नाही त्यानेच व्यभिचारी महिलेस दगड मारावा असा निर्णय देऊन या व्यवस्थेला आरसा दाखविण्याचे काम हजारो वर्षांपूर्वीच्या त्या कथेतून केले गेले, म्हणून ती कथा आजही कालसुसंगत ठरते. आज समाजात व्यवस्थेविरुद्ध असंतोष उमटलेला दिसतो. त्या असंतोषाला वाचादेखील फुटते आहे. समाजातील भ्रष्ट लोकांनी बनावट बुरखे पांघरूण काही व्यवस्थांमध्ये शिरकाव केल्याची खंत व्यक्त करताना भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर संवेदनशील समाज असाच खवळून उठला. समाजमाध्यम नावाच्या मंचावर या संतापाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत आणि व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविण्याचा हाकारादेखील सुरू झाला आहे. या सुरात सूर मिसळून समाजाने आता व्यवस्थेला धडा शिकविण्यासाठी हात उगारले आहेत. अशा वेळी बायबलमधील त्या कथेचा संदर्भ आठवतो आणि एक प्रश्न उभा राहतो, ‘व्यवस्थेच्या विरोधात पेटून उठणाऱ्या समाजासमोर आरसा धरण्याची गरज निर्माण झाली आहे का?’ ज्या व्यवस्थेच्या विरोधात समाज पेटून उठतो आहे, ती व्यवस्था समाजाच्या जीवनशैलीतूनच उभी राहिलेली असेल, तर व्यवस्थेच्या बिघडलेल्या घडीसाठी जबाबदार नेमके कोण असणार आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधणेदेखील गरजेचे आहे. गुन्हेगाराचा शोध घेणाèया गर्दीत सहभागी झालेला कोणी स्वतःच गुन्हेगार असेल, तर तो व्यवस्थेला जाब कसा विचारू शकेल हा प्रश्नदेखील भीमराव कांबळेवरील गुन्ह्याच्या आरोपानंतर ठळकपणे अधोरेखित झाला आहे. पाप, पुण्य या कल्पना कालबाह्य होऊ लागल्या आहेत. त्याची चाडदेखील आता फारशी राहिलेली नाही. अन्यथा, येशू ख्रिस्ताने दिलेला निवाडा आजच्या समाजात दिला गेला, तर किती माना लाजेने खाली जातील आणि शिक्षा देण्याच्या आवेशाने उगारले गेलेले किती हात शरमेने खाली येऊन गर्दी घरोघरी जाईल, हा चिंतनाचा मुद्दा ठरेल.
 
व्यक्ती, कुटुंब, समाज आणि व्यवस्था यांचे चेहरे व मुखवटे यांतील फरक स्पष्ट करून दाखविणारे आरसे आसपास असतात. काचेच्या घरात राहणाèयांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये असा इशारा जेव्हा कोणीतरी अन्य कोणास देतो, तेव्हा तो आरसा दाखविण्याचा एक प्रयत्न असतो. हमाम में सब नंगे है, असाही दाखला काही प्रसंगी दिला जातो. त्यामुळे, व्यवस्था हा समाजाच्या आणि व्यक्ती, कुटुंबाचा भाग आहे, हे वेगळे सांगावे लागत नाही. अन्याय, अत्याचार, व्यभिचार, भ्रष्टाचार ही व्यवस्थेला लागलेली कीड आहे, म्हणजे ती समाजाला लागलेली कीड आहे आणि व्यक्ती, कुटुंब येथूनच त्याची सुरुवात झालेली आहे, हे उघड आहे. अन्यथा, व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी सरसावणारे अनेक जण काचेच्या घरात राहतात, हे माहीत असूनही व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षाचे नेतृत्व करावयास ते सर्वांत पुढे असले तरी त्याबद्दल फारशी तक्रार केली जात नाही. व्यवस्थेविरोधातील संघर्षात पहिला दगड कोणी मारावा हा मुद्दाच त्यामुळे कालबाह्य झाला आहे.
 
व्यक्ती, कुटुंब हा समाजाचाच घटक असतो, त्यामुळे तो व्यवस्थेचाच भाग असतो, त्यामुळे कुटुंब आणि व्यक्ती या व्यवस्थेलाही आता आरशात पाहावे लागेल, हे स्पष्ट आहे. अलिकडेच, सुमारे आठवडाभरापूर्वी, उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका गावात 18 वर्षांच्या एका नवविवाहितेने सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या जीवाला धोका आहे अशा शंकेने भयभीत झालेल्या या तरुणीने आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर असहायपणे आपल्या जन्मदात्यास फोन करून घरी घेऊन जाण्याची विनवणी केली होती, असे सांगण्यात येते. माहेराहून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिच्यापाठी पतीने आणि सासरच्यांनी तगादा लावला होता आणि त्यामुळेच प्रचंड मानसिक तणावातून तिने पित्याला माहेरी घेऊन जाण्याचे साकडे घातले आणि अखेर एका अगतिक क्षणी असहायपणे आपले आयुष्य संपविले. हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या माणसांनी केला आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये या तरुणीचा विवाह झाला, तेव्हा तिच्या पित्याने भरपूर हुंडा दिला होता, पण आणखी पैसे आणण्यासाठी तिचा छळ होत होता. या भयाखाली वावरणाऱ्या त्या तरुणीने त्या दिवशी रडत आपल्या पित्याला गाऱ्हाणे घातले, पण तिचा जन्मदाता तिला माहेरी नेण्याकरिता येण्याआधीच तिने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले होते. अशाच घटनेची पुनरावृत्ती त्याच दरम्यान महाराष्ट्रात नागपूरमध्ये उघडकीस आली. 19 वर्षांच्या एका नवविवाहितेचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ सुरू होता, त्या सूडातूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचा कांगावा पोलिसांसमोर करण्यात आला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर, तिच्या शरीरावरील झटापटीच्या खुणा आणि श्वास गुदमरल्यामुळे झालेल्या यातना यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे खरे कारण उघड झाले. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडामध्ये जालपुरा गावात एका नवविवाहितेस हुंड्यासाठी छळ करून ठार मारल्यानंतर, घराच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीतून पडून मृत्यू झाल्याचा कांगावा करणाऱ्या कुटुंबाचा कट पोलिसांनी उघडकीस आणला. व्यक्ती, कुटुंब, हा समाजाचा, पर्यायाने व्यवस्थेचाच एक घटक असल्याने अशा घटना व्यवस्थेच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्हे उमटवणार हे स्पष्ट आहे. त्याच दरम्यान, उत्तर प्रदेशात अलिगड येथे घडलेली एक घटनादेखील व्यक्ती, समाज आणि व्यवस्था यांच्यासमोर आरसा धरणारी ठरली आहे. आपल्या मुलीस प्रियकरासोबत बोलत असताना पाहून चिडलेल्या पित्याने तिला बांधले आणि अर्धवट बेशुद्धावस्थेत असलेल्या आपल्या मुलीला मोटारसायकलवर टाकून बाजूच्या शेतात नेऊन तिची हत्या केली. तिचा मृतदेह तेथेच पुरला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी बेपत्ता झाल्याचा कांगावा करत शोधमोहिमेत सहभागी झाला. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील नसरापुरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या व मृतदेहाची शेणाच्या ढिगाऱ्याखाली विल्हेवाट लावून गुन्हा लपवत व्यवस्थेस जाब विचारण्यासाठी गर्दीत सहभागी झालेल्या भीमराव कांबळेनेदेखील असेच केले होते.
वाराणसी येथील सरकारी निवारागृहात मे महिन्याच्या सुरुवातीस आत्महत्या करून आपले आयुष्य संपविणाèया या कोवळ्या मुलीची कहाणी करुण आणि माणुसकी, व्यवस्था, व्यक्ती, समाज, कुटुंब या सर्वांवर प्रश्नचिन्हे उमटविणारी आहे. जौनपूरच्या एका भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील ही सर्वांत लहान मुलगी. आईच्या अकाली निधनानंतर पित्याच्या कमाईवरच पोट भरणाèया या कुटुंबातील अन्याय आणि ओढगस्तीमुळे तणावाखाली असलेली ही जेमतेम 12 वर्षांची मुलगी एका क्षणी मित्राचा हात धरून घरातून पळून गेली. नातेवाईकांनी तिचा शोध घेऊन तिला घरी आणले, पण ती अस्वस्थ होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिने भावासोबत जौनपूरचे पोलिस ठाणे गाठले आणि कौटुंबिक लैंगिक हिंसाचाराचे एक अस्वस्थ करणारे प्रकरण उघडकीस आले. मारून टाकण्याच्या धमक्या देत या कोवळ्या मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार करणाèया तिच्या बापानेच त्याच्या दुसèया मुलीलाही आपल्या वासनेची शिकार केले होते.society is sensitive त्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला आणि घाबरलेल्या या पीडित मुलीने पोलिसांना साकडे घातले. अत्याचारी बापास अटक होऊन शिक्षा झाली आणि पीडित मुलीस वाराणसीच्या सरकारी निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. जबर मानसिक आघाताखाली असलेल्या या मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर निवारा केंद्रातून बाहेर पडावे लागेल आणि बाहेरच्या जगात आपल्या जवळचे कोणीच नसल्याने येथून बाहेर पडल्यानंतर आपण समाजात सुरक्षित राहणार नाही, या भीतीने तिने निवारा केंद्रातच आत्महत्या केली. वाढत्या वयाची समज येण्याआधीच खडतर संघर्ष करत जगण्याच्या भयाने जीवन संपविणाऱ्या या मुलीने एका भीषण सामाजिक वास्तवाचे रूप दाखवून दिले आहे. तिची कहाणी पचविणे समाजासाठी सोपे नाही. लैंगिक अत्याचाराची शिकार होणाऱ्या बालकांच्या मानसिक स्थितीचे एक अस्वस्थ चित्र तिच्या कहाणीतून उमटले आहे आणि त्यातून समाज व व्यवस्थेस काही प्रश्नदेखील विचारले गेले आहेत. अनेकदा, अशा अत्याचाराविरोधात बळी पडणाऱ्यांना गप्प राहण्याचे सल्ले समाजातून किंवा कुटुंबाकडून दिले जातात. समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, समाज कोणत्या नजरेने पाहील, अशी भीती जेव्हा पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबांना सतावते, तेव्हा प्रश्नचिन्हांचा रोख साहजिकच, समाजाकडेही वळलेला असतो. अशा असंख्य पीडिता तोंड दाबून समाजात वावरत असतात. त्यामुळे, व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी सरसावलेल्या समाजातून, पहिला दगड मारण्यासाठी कोण पुढे येणार हा प्रश्न विचारण्याचीही गरज आता निर्माण झाली आहे.