वाशिम
Suresh Mapari महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या पक्षांतरांचे वारे जोरात वाहत असताना विदर्भातील वाशिम जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसणार आहे . वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सुरेश मापारी हे आपल्या सुमारे २०० ते २५० समर्थकांसह आज Suresh Mapari मुंबईत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या प्रवेश सोहळ्यासाठी वाशिमहून २९ वाहनांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने स्थानिक पातळीवर या घडामोडींनी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना (उबाठा) पक्षाने वाशिम जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सुरेश मापारी यांच्याकडून काढून घेत बालाजी वानखेडे यांच्याकडे सोपवली होती. या निर्णयानंतर मापारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील स्थानिक नेतृत्व आणि अंतर्गत राजकारणावरही त्यांनी असंतोष व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यापूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र अखेर त्यांनी भाजपचा मार्ग निवडला आहे.
सुरेश मापारी हे वाशिम Suresh Mapari जिल्ह्यातील प्रभावशाली आणि अनुभवी राजकीय नेते मानले जातात. माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनाधार असून त्यांच्यासोबत असलेला कार्यकर्त्यांचा मजबूत गट जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना (उबाठा) गटाला फटका बसू शकतो, तर भाजपची संघटनात्मक ताकद वाशिम जिल्ह्यात अधिक बळकट होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.