पश्चिम बंगाल
free bus travel scheme महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि सार्वजनिक परिवहन सुविधांपर्यंत त्यांचा प्रवेश सुलभ करण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी बसांमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास योजना जाहीर केली आहे. ही योजना १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू होणार असून या निर्णयामुळे लाखो महिला प्रवाशांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.
पश्चिम बंगाल सरकारच्या परिवहन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व लहान व लांब पल्ल्याच्या सरकारी बस सेवांमध्ये महिलांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्णयाचा उद्देश महिलांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांचा प्रवास अधिक सुलभ करणे हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, ही योजना पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी लाभार्थी महिलांसाठी विशेष स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली जाणार आहे. हे स्मार्ट कार्ड क्यूआर कोडयुक्त डिजिटल स्वरूपात असेल, ज्यावर लाभार्थ्याचा फोटो आणि नाव असेल. संबंधित क्षेत्रातील बीडीओ किंवा एसडीओ कार्यालयांमार्फत हे कार्ड वितरित केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी free bus travel scheme महिलांना ओळखपत्रांसह अर्ज करावा लागणार आहे. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, आरोग्य विमा कार्ड, रोजगार हमी कार्ड तसेच शासकीय किंवा शैक्षणिक संस्थांनी जारी केलेली ओळखपत्रे यांसारखी कागदपत्रे वैध मानली जाणार आहेत. अलीकडील छायाचित्रासह इतर अधिकृत ओळखपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे.स्मार्ट कार्ड जारी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही सुविधा लागू राहणार असून त्या काळात महिलांना प्रवासादरम्यान ओळखपत्र दाखवावे लागेल. पडताळणीनंतर वाहकाकडून ‘शून्य मूल्य तिकीट’ किंवा थर्मल पेपर तिकीट दिले जाणार आहे, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.या निर्णयामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना विशेष लाभ मिळणार आहे. सरकारच्या या पावलाचे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून स्वागत केले जात आहे.