अंजनगाव सुर्जी,
Tamil Nadu Woman in Anjangaon कर्तव्यदक्षता, संवेदनशीलता आणि आधुनिक तांत्रिक तपास यांचा सुंदर संगम घडवत अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तमिळनाडूतून हरवलेल्या एका मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलेचा शोध घेऊन तिला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे पोलिसांच्या मानवतावादी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.१२ मे २०२६ रोजी परतवाडा रोड परिसरात एक अनोळखी महिला रस्त्यावर भटकताना आढळून आली होती. डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनंतर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला सुरक्षित ताब्यात घेतले. सुरवातीला महिलेकडे कोणतीही ओळखपत्रे नसल्याने तिची ओळख पटविणे मोठे आव्हान ठरत होते. विशेष म्हणजे, महिलेला फक्त तामिळ भाषा समजत असल्यामुळे संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र पोलिसांनी हार न मानता दुभाषीच्या मदतीने महिलेशी संवाद साधला. चौकशीत तिने आपले नाव के. भार्ग्यम असून वडिलांचे नाव एस. कलियाप्पन असल्याचे सांगितले. ती तामिळनाडू राज्यातील वेलुपुरम जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी संयम आणि चिकाटी कायम ठेवत तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान १८ मे २०२६ रोजी तामिळनाडूतील वेलुपुरम जिल्ह्यात संबंधित महिलेबाबत मिसिंग तक्रार दाखल असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. त्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. अखेर २३ मे रोजी महिलेचे भाऊ के. राजशेखरन आणि के. भास्करन अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात दाखल झाले. अनेक दिवसांनंतर आपल्या भावांना पाहताच महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने दोघांना ओळखून तेच आपले भाऊ असल्याचे सांगितले. उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांसाठीही हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महिलेला तिच्या भावांच्या ताब्यात सुखरूप सोपविण्यात आले. कुटुंबीयांनी अंजनगाव सुर्जी पोलिसांचे मनापासून आभार मानले. ही उल्लेखनीय कारवाई पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक तोटावाड, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सूरज बोंडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद धाडसे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.