अहिल्यानगर
headquarters blast अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान अनपेक्षित दुर्घटना घडली असून हँड ग्रेनेडचा स्फोट होऊन चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलीस मुख्यालय परिसरात काही काळासाठी मोठी खळबळ उडाली होती.
अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत आहेत. पोलीस आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक सादर करत असतानाच ही दुर्घटना घडली.
प्रात्यक्षिकादरम्यान एका हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला आणि त्यात चार कर्मचारी जखमी झाले. जखमींमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके यांचा समावेश आहे. या घटनेत दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या करंगळ्या तुटल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर दोन कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
स्फोटानंतर घटनास्थळी headquarters blast गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेबाबत एका जखमी कर्मचाऱ्याने घटनेचा तपशील संगितला मॉक ड्रिलचा डेमो सुरू असताना त्यांच्या हातात ग्रेनेड देण्यात आले होते. मात्र त्याच्या हाताळणीबाबत पूर्ण माहिती किंवा स्पष्ट सूचना देण्यात आल्या नसल्याचे त्याने सांगितले. ऑर्डरनंतर पिन ओढताच ग्रेनेडचा स्फोट झाल्याचेही त्याने स्पष्ट केले. स्फोटामुळे डोळ्यात धूर गेल्याचे आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे त्याने सांगितले. प्रात्यक्षिकादरम्यान योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशिक्षण आणि मॉक ड्रिल प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या दुर्घटनेनंतर पोलीस मुख्यालय परिसरात तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.