‘जनता खाना’तून रेल्वे प्रवाशांना ‘समाधानाचा स्वाद’

दपूम रेल्वेची प्रवाशांसाठी किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण भोजन योजना

    दिनांक :25-May-2026
Total Views |
गोंदियासह नागपूर मंडळातील सहा स्थानकांवर सुविधा
 
गोंदिया,
Janata Khana रेल्वे प्रवासात प्रवाशांना सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे स्वच्छ, ताजे आणि परवडणारे अन्न मिळण्याची. याच गरजेची अचूक जाणीव ठेवत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने ‘जनता खाना’ योजना सुरू केली आहे. ही योजना सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे. नागपूर मंडळातील गोंदियासह महत्वाच्या सहा रेल्वेस्थानकावर ही सुविधा सुरु करण्यात आली असून रेल्वेच्या या उपक्रमाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 
 
Janata Khana
 
सामान्य श्रेणीतील प्रवाशांना अल्प दरात पौष्टिक, स्वच्छ आणि दर्जेदार भोजन उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Janata Khana रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आता लांब पल्ल्याच्या प्रवासातही प्रवाशांना समाधानाचा घास सहज उपलब्ध होत आहे. नागपूर मंडळांतर्गत गोंदिया, नैनपूर, छिंदवाडा, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, राजनांदगाव आणि डोंगरगड यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जनता खाना सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवाशांना अत्यंत माफक दरात ताजे आणि पौष्टिक भोजन दिले जात आहे.
 
 
सामान्य डब्यातून प्रवास करणार्‍या आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय व श्रमिक प्रवाशांसाठी ही योजना विशेष लाभदायी ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने भोजनाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थांची स्वच्छता, ताजेपणा आणि पोषणमूल्य यांची नियमित तपासणी केली जात असून प्रवाशांना सुरक्षित व आरोग्यदायी भोजन मिळावे यासाठी आवश्यक मानकांचे काटेकोर पालन करण्यात येत असून अनेक प्रवाशांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. Janata Khana दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर मंडळ भविष्यातही अशाच जनहितकारी योजना राबवून प्रवासी सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे ‘प्रवास सुखकर आणि अन्न समाधानकारक’ ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.