अहेरी,
Aheri Nagar Panchayat Ward 9 By-election अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधील रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय रणधुमाळी आता खर्या अर्थाने सुरू झाली आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केले. दिग्गजांच्या उपस्थितीत अर्ज दाखल झाले असून भारतीय जनता पार्टीतर्फे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली माया शंकर येल्लूरकर यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे संजना हनुमंतु मडावी यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत गांगुर्डे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजित सोनवाणे (नगर पंचायत अहेरी) यांच्याकडे सुपूर्द केले.

उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे अहेरी शहरात आज राजकीय चैतन्य पाहायला मिळाले. अहेरीत रणसंग्रामाला सुरू झाले असून प्रभाग 9 च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी (शप) आमनेसामने लढत पहायला मिळणार आहे. निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी व पडताळणी आज 26 मे रोजी सकाळी 11 वाजता केली जाणार आहे.
का होत आहे पोटनिवडणूक?
प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपाच्या विद्यमान नगरसेविका सुनीता किशोर मंथनवार यांचे काही महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या एका जागेसाठी येत्या 20 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) देखील जोरदार आव्हान उभे केले आहे. दोन्ही पक्षांच्या तगड्या उमेदवारांमुळे ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत असून, आता संपूर्ण अहेरी शहराचे लक्ष आज, 26 मे रोजी होणार्या अर्ज पडताळणीकडे आणि त्यानंतरच्या प्रचाराकडे लागले आहे.