गोंदिया जिल्ह्यात बुधवारपर्यंत उष्णतेचा ‘येला अलर्ट’

नवतपाच्या पहिल्याच दिवशी तापमान 46 अंश पार

    दिनांक :25-May-2026
Total Views |
गोंदिया, 
Alert Issued in Gondia विदर्भासह गोंदिया जिल्ह्यावर यंदा उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काल, रविवारी 24 मे रोजी तापमान 45 अंशावर असताना आज 25 मेपासून सुरू झालेल्या नवतपाच्या पहिल्याच दिवशी 46.1 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यात हवामान खात्याने बुधवारपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून पुढील नऊ दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा आधीच 45 अंशाच्या पार झाला आहे. नवतपाच्या काळात सूर्याची किरणे अधिक तीव्रतेने पृथ्वीवर पडत असल्याने उष्णतेचा प्रभाव वाढतो.
 

temperature today 
 
 
यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. वैद्यकीय तज्ज्ञांनी उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांना भरपूर पाणी पिणे, हलके सूती कपडे परिधान करणे, थेट उन्हात न जाणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे शेतकरी वर्गही चिंतेत असून धान उत्पादक गोंदिया जिल्ह्यात पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तलाव आणि जलस्रोतांचे पाणी झपाट्याने आटत असल्याने शहरीभागासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनानेही नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात बुधवार 27 मेपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून 28 मे रोजी तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गुरुवारी 29 मे रोजी विजेच्या कडकडाट, वारा व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
 
उष्णतेपासून बचावासाठी करा हे उपाय
* भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्या
* दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळा
* डोक्यावर टोपी, स्कार्फ वापरा
* लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्या
* उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या