दुर्बीणीच्या मदतीने मृतदेहांचा शोध 8 तरूणांचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :25-May-2026
Total Views |
पुणे/सातारा
Ambenali Ghat accident महाबळेश्वर–पोलादपूर दरम्यान असलेल्या धोकादायक आंबेनळी घाट परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. कोकणातून परतणाऱ्या पर्यटकांच्या स्कॉर्पिओ जीपचा चालकावरील ताबा सुटून ती खोल दरीत कोसळल्याने आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुमारे 1500 फूट खोल दरीत ही गाडी कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
 

Ambenali Ghat accident 
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील काही तरुणांचा मित्रांचा गट कोकणातील सहलीवरून परतत असताना हा अपघात घडला. रविवारी आणि सोमवारी पहाटे साधारण 2.45 च्या सुमारास दाबेली गावाजवळ ही घटना घडली. पहाटेच्या वेळी घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली.अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड बचाव पथक, सिस्केप महाड, आपदा मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अत्यंत दुर्गम आणि खोल दरी असल्यामुळे मदतकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी दुर्बिणींचा वापर केला जात असून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे.
 
दरम्यान, या अपघातानंतर Ambenali Ghat accident संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि बचाव पथक तैनात करण्यात आले असून मृतदेह पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात 2018 मधील अपघाताच्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत, जेव्हा याच भागात एक बस दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली होती.या अपघातात मृत झालेल्या तरुणांची ओळख पटली असून महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25), सुहास जितेंद्र लोखंडे (20), अंश समीर चव्हाण (18), उत्कर्ष आनंद शिंगटे (21), अनिल अभिमन्यू शिंगटे (25) आणि नितीन किसन नायकोंडे (35) अशी त्यांची नावे आहेत. सर्वजण सातारा आणि परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.या भीषण अपघातामुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.