नागपूर,
Navatapa नागपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. बुधवारी नागपूरचे कमाल तापमान तब्बल ४६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. कडक उन्हाचा तडाखा, गरम वारे आणि दुपारच्या वेळी जाणवणारा प्रचंड उकाडा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून, नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २५ मेपासून “नवतपा” कालावधीला सुरुवात होत असून ही तीव्र उष्णतेची लाट २ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. Navatapa त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे, दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळणे तसेच लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. लोकमान्यतेनुसार “नवतपा”च्या दिवसांत गोरगरिबांना पाणी, ताक, फळे किंवा अन्नदान केल्यास पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे शहरात विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून पाणपोई, शरबत वाटप तसेच सेवा उपक्रम राबविले जात आहेत.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र