‘साहेब, तुम्हीच सांगा घर कसे चालवायचे..!

    दिनांक :25-May-2026
Total Views |
‘आशां’चे मानधन रखडले

राळेगाव,
आरोग्य दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या गटप्रवर्तक आणि Asha Swayamsevika आशा स्वयंसेविकांचे गेल्या सात महिन्यांचे मानधन रखडल्याने शेकडो ‘आशां’पुढे अन्न शिक्षण आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांकडून केला जात आहे. राळेगाव तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र 32 उपकेंद्र आहेत. यामध्ये वाढोणाबाजार केंद्रात विहिरगाव, रिधोरा, आटमुर्डी, आंजी, येवती, अंतरगाव, वाढोणा (1), वाढोणा (2), वरध केंद्रात सावरखेडा, पळसकुंड, कारेगाव, लोणी, सराटी, वरूड, झाडगाव, पिंपळखुटी, वरध, धानोरा केंद्र आणि सावंगी, आष्टा, पिंपरी, वाटखेड, जळका धानोरा, राळेगाव (1), राळेगाव (2), दहेगाव केंद्रात देवधरी, खडकी, चहांद, बोरी (इचोड), वडकी, खैरी असे 32 उपकेंद्र आहेत.
 
 
asha
 
या उपकेंद्रांत 140 आशा व 11 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. तालुक्यात असलेल्या आशा स्वयंसेविका सतत कार्यरत असून सात महिन्यांपासून त्यांना मानधन मिळाले नसल्याने ‘आशां’चे ‘काम चालू मानधन बंद’ अशी अवस्था झाली आहे. या तुटपुंजा मानधनावर आरोग्य यंत्रणाचा खंबीरपणे डोलारा पेलणारा कणाच आता मानधनाअभावी पुरता खचून गेला आहे. महागाईने वस्तूचे दर गगनाला भिडले असताना घरखर्चासह इतर खर्चाचा मेळ घालायचा कसा हा प्रश्न गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांसमोर उभा ठाकला असून अनेकींना कर्ज काढून उसनवारी घेऊन घर चालवावे लागत आहे.
 
 
Asha Swayamsevika  शहरी तसेच ग्रामीण भागात ‘आशां’ना रोज घरोघर जाऊन गर्भवती महिलांची काळजी आणि संसर्गजन्य रोगाबाबत जनजागृती, नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस करून अहवाल तयार करणे, नोंदवही अद्यावत करणे, लसीकरण, डेंग्यु, मलेरिया, सिकलसेल अशी विविध कामे करावी लागत आहेत व ती आजही सुरूच आहेत. हातचे काम सुरू आणि मानधन बंद अशी केविलवाणी वेळ आशांवर आली आहे. आरोग्याच्या पायाभूत सेवेत महत्त्वाचे योगदान देणाèया आशांचे वेतन सातत्याने रखडत असल्याने ‘काम करा आणि उपाशी मरा’ अशी अवस्था असल्याचे सांगून शासनाने मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी गटप्रवर्तक आणि आशांकडून केली जात आहे.