‘बजरंगी’च्या खून प्रकरणी एक संशयित ताब्यात

    दिनांक :25-May-2026
Total Views |
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात

उमरखेड, 
Bajrangi’ Murder Case गोवंश तस्करी रोखणाऱ्या  एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गोवंश तस्करांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री सुकळी (ज) येथे घडली असून त्यातील एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तैनात केली आहेत.
 

y25May-Gajanan-Suroshe 
 
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एमएच29 बीई8915 या बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशाची अत्यंत निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी उमरखेडच्या दिशेने तस्करी केली जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यावरून आपल्या डोळ्यांदेखत गोवंशाची तस्करी होत असल्याचे पाहून ‘बजरंगी’ गजानन सुरोशे यांनी तातडीने आपल्या एमएच12 पीटी8634 या कारने तस्करांच्या वाहनाचा थरारक पाठलाग सुरू केला. सुकळी गावात ही दोन्ही वाहने गेली असता तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या गाडीवर मोठमोठे दगड आणि लाकडी दांडक्यांनी भीषण हल्ला चढवला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
तणावपूर्ण वातावरणात वडद येथे अंत्यसंस्कार
Bajrangi’ Murder Case  मृत गजानन सुरोशे विवाहित होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, बारा वर्षांचा मुलगा, दहा वर्षांची मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे. नांदेड येथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवार, 24 मेच्या दुपारी 4 वाजता वडद येथे त्यांच्या पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीपूर्वी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेतील सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाल्याने अंत्यविधी पार पडले. यावेळी परिसरातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.