लातूर,
CBI Interrogates Scrap Dealers नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक आणि अनपेक्षित वळण समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (तपासाचा फोकस आता केवळ संशयितांपुरता मर्यादित न ठेवता पुराव्यांच्या साखळीवर केंद्रित केला आहे. लातूरमधील जवळपास ५० रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याची तयारी सीबीआयने सुरू केली असून, रद्दीत विकल्या गेलेल्या नोट्स आणि कागदपत्रांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तपासादरम्यान दोन डॉक्टरांनी नीट परीक्षेनंतर नोट्स आणि काही महत्त्वाची कागदपत्रे रद्दीत विकल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तपास यंत्रणांनी रद्दीत गेलेल्या कागदपत्रांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या कागदपत्रांमध्ये नीटच्या प्रश्नपत्रिकेची प्रत किंवा संबंधित साहित्य होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
सीबीआयने आतापर्यंत चार डॉक्टरांची चौकशी केली असून, त्यांच्याकडून मोबाईल फोन, संशयास्पद कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चौकशीत आणखी तीन डॉक्टरांची नावेही समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे लातूरमधील तपासाचा फास अधिकच आवळला जात असल्याचे चित्र आहे.दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या पॅनेलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांनी चौकशीत या तज्ज्ञाच्या सूचनेनुसार काही प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर या प्रक्रियांदरम्यान गळती झाली असण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आता लातूरपुरती मर्यादित न राहता पुणे आणि राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकरणात रद्दीत गेलेल्या कागदपत्रांमधून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे विद्यार्थ्यांसह देशभराचे लक्ष लागले आहे.