मोबाईलच्या विळख्यात हरवले बालपण..!

    दिनांक :25-May-2026
Total Views |
अश्लील, हिंसक व्हिडिओंचा मुलांच्या मनावर परिणाम
पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज

पांढरकवडा, 
Children and Mobile स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांचे बालपण मोबाईलच्या विळख्यात अडकत चालले आहे. घरातील अनेक पालक मुलांना शांत ठेवण्यासाठी, जेवण करण्यासाठी किंवा रडणे थांबवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र हीच सवय पुढे मुलांसाठी घातक ठरत असल्याचे चित्र आहे. लहान मुले मोबाईलवर गेम खेळणे, यूट्युबवरील व्हिडिओ पाहणे आणि इंटरनेट वापरणे यात तासन्तास गुंतून राहत आहेत. इंटरनेटवर चांगल्या माहितीबरोबरच अश्लील, हिंसक, मारामारी, चोरी तसेच लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओ सहज उपलब्ध होत असल्याने मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक वेळा पालकांच्या नकळत मुले एकांतात मोबाईल वापरत असतात आणि अशा वेळी ते अयोग्य दृश्य पाहण्याची शक्यता अधिक वाढते.
 

Children and Mobile 
 (संग्रहित छायाचित्र)
 
मानसोपचार तज्ञांच्या मते, सतत मोबाईल वापरणाऱ्या  मुलांमध्ये चिडचिड, राग, हट्टीपणा, एकटेपणा आणि अभ्यासात लक्ष न लागणे अशा समस्या वाढत आहेत. हिंसक किंवा अश्लील दृश्यांचा परिणाम मुलांच्या वर्तनावरही होत असून काही मुले चुकीच्या गोष्टींचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतात. यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, झोप न लागणे, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचाली कमी होणे अशा समस्या देखील वाढत आहेत. मैदानी खेळ आणि पुस्तकांपासून मुले दूर जात असल्याची चिंता पालक व शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
 
 
 
Children and Mobile  तज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मुलांनी कोणते व्हिडिओ पाहतात, किती वेळ मोबाईल वापरतात याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच मुलांना मोबाईलऐवजी खेळ, वाचन, कला आणि सामाजिक उपक्रमांकडे वळविण्याची गरज व्यक्त होत आहे. डिजिटल युगात मोबाईल पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्याचा मर्यादित आणि सुरक्षित वापर होणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. पालकांनी वेळीच जागरूक न झाल्यास मोबाईलचे वाढते व्यसन मुलांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.