“गोहत्या खपवून घेणार नाही”; महाराष्ट्र सरकारचा इशारा

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मुंबई,
cow slaughter बकरीदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने गोवंशीय तस्करी आणि अवैध कत्तलीविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. “गोवंशीय तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यभर युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
cow slaughter
 
 
परिवहन विभागाने २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत विशेष तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप-प्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे राज्याने देशी गायीला ‘राज्यमाता’ म्हणून सन्मान दिला आहे. गाय ही हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडलेली असल्याचे सांगत त्यांनी गोवंशीय तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. “पवित्र गायींची कत्तल करणाऱ्यांना आणि अवैध तस्करी करणाऱ्यांना कायद्याद्वारे कठोर धडा शिकवला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष सणांच्या काळात गायींची तस्करी वाढत असल्याचा दावा करत सरनाईक म्हणाले की, अनेकदा जनावरांना अमानुषपणे वाहनांमध्ये कोंबले जाते, उपाशी ठेवले जाते आणि नियमांचे उल्लंघन करून त्यांची वाहतूक केली जाते. हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार आहे. वाहनांकडे आवश्यक परवाने, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहने तात्काळ जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही मोहीम परिवहन विभाग, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग तसेच विविध गो-संगोपन आणि प्राणी कल्याण संस्थांच्या समन्वयाने राबवली जाणार आहे.cow slaughter अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.
“गोसंरक्षण हा केवळ कायद्याचा विषय नाही, तर हिंदू अस्मितेचा प्रश्न आहे. निष्पाप प्राण्यांचा छळ करणाऱ्यांपुढे सरकार झुकणार नाही,” असे ठाम विधान प्रताप सरनाईक यांनी केले. या विशेष मोहिमेअंतर्गत झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.