नवी दिल्ली,
Dharmendra posthumous Padma Vibhushan भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. २५ मे रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष सोहळ्यात त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. या भावनिक क्षणी संपूर्ण कुटुंब आणि उपस्थित मान्यवर भावुक झाले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या समारंभात हेमा मालिनी आपल्या मुलगी अहना देओल सोबत उपस्थित होत्या. पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी अत्यंत भावनिक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याचवेळी वडिलांना सन्मानित होताना पाहून अहानाही अश्रू आवरू शकली नाही. या क्षणाने उपस्थितांचे मन हेलावून गेले.

सोहळ्यादरम्यान हेमा मालिनी यांनी आपल्या पतीचा सन्मान स्वीकारताना कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की धर्मेंद्र यांच्या योगदानाचा अभिमान संपूर्ण कुटुंबाला आहे. कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य अनुपस्थित असल्याचीही माहिती समोर आली. धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सहा दशकांहून अधिक काळ काम करत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. 'शोले, ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या साधेपणाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी अनेक पिढ्यांच्या प्रेक्षकांवर छाप सोडली. जरी ते आता आपल्यात नसले तरी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमर राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.