फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचची दमदार सलामी

    दिनांक :25-May-2026
Total Views |
पॅरिस,
Djokovic's at French Open पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने शानदार विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या लक्ष्याने मैदानात उतरलेल्या जोकोविचने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या जिओव्हानी म्पेत्शी पेरिकार्डला चार सेटमध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.रोलाँ गॅरोसच्या कोर्टवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीला मात्र जोकोविचला अपेक्षेपेक्षा जास्त संघर्ष करावा लागला. घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वासाने खेळणाऱ्या जिओव्हानीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अनुभवी जोकोविचवर दबाव निर्माण केला. त्याच्या वेगवान आणि अचूक सर्व्हिसमुळे जोकोविच अनेकदा बचावात्मक भूमिकेत दिसला. पहिल्या सेटमध्ये जिओव्हानीने ७-५ अशी बाजी मारत सामन्यात मोठी उत्सुकता निर्माण केली.
 

djokovic 
 
विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांनंतर फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत जोकोविचविरुद्ध सेट जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्यामुळे सुरुवातीला जोकोविचसमोर मोठे आव्हान उभे राहणार, अशी चर्चा रंगू लागली होती.मात्र अनुभवी जोकोविचने दुसऱ्या सेटपासून सामन्याचे चित्र बदलले. त्याने संयम आणि अनुभवाच्या जोरावर खेळावर नियंत्रण मिळवले. दुसरा सेट ७-५ ने जिंकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये त्याने एकतर्फी वर्चस्व गाजवत ६-१ अशी सहज बाजी मारली. चौथ्या सेटमध्ये जिओव्हानीला हात आणि मनगटाच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही त्याने झुंज कायम ठेवली, पण जोकोविचच्या अचूक खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. निर्णायक क्षणी ब्रेक मिळवत जोकोविचने चौथा सेट ६-४ ने जिंकला आणि सामना आपल्या नावावर केला.
 
 
या विजयासह जोकोविचने फ्रेंच ओपनमध्ये सलग २२व्यांदा पहिल्या फेरीत विजय मिळवण्याचा विक्रम कायम राखला. तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धांतील सर्वाधिक एकेरी सामने जिंकण्याच्या यादीतही त्याने नवा इतिहास रचत रॉजर फेडरर याचा विक्रम मागे टाकला. सामन्यानंतर बोलताना जोकोविचने प्रतिस्पर्ध्याचे कौतुक केले. “जिओव्हानीची सर्व्हिस अत्यंत वेगवान आणि प्रभावी होती. अशा प्रकारची ताकद फार कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळते,” असे तो म्हणाला. तसेच रोलाँ गॅरोसमधील वातावरण आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला. आता पुढील फेरीत जोकोविच कशी कामगिरी करतो आणि तो २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकत नवा इतिहास रचतो का, याकडे संपूर्ण टेनिसविश्वाचे लक्ष लागले आहे.