अग्रलेख...
Dummy college culture गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात अत्यंत धोकादायक असा प्रवाह वाढताना दिसतो आहे आणि त्याचे नाव ठेवले गेले आहे- डमी कॉलेज संस्कृती. विद्यार्थ्याने नावाला कुठल्या तरी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, पण प्रत्यक्षात कॉलेजमध्ये जायचेच नाही. वर्षभर खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये बसायचे आणि कॉलेज केवळ उपस्थिती, अंतर्गत गुण आणि बोर्ड किंवा विद्यापीठाच्या प्रक्रियांसाठी वापरायचे. अनेक शहरांत ही गोष्ट इतकी सामान्य झाली आहे की जे काही सुरू आहे ते चुकीचे आहे, असे कुणालाच वाटत नाही. या स्थितीमुळे शिक्षणाचा आत्माच हरवत चालला आहे. मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेशाच्या वाढत्या शर्यतीमुळे खाजगी क्लासेसचे जाळे प्रचंड वाढले. सुरुवातीला हे क्लासेस विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणारे आणि स्पर्धेसाठी तयार करणारे माध्यम होते. हळूहळू त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाची जागा घेतली. आता बहुसंख्य पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मत असे झाले आहे की, शाळा आणि महाविद्यालये या केवळ औपचारिकता आहेत. खरे शिक्षण कोचिंग क्लासेसमध्येच मिळते. अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बाके रिकामी दिसतात. शहरांमध्ये तर महाविद्यालये आणि त्यातही अकरावी-बारावीचे वर्ग अत्यंत भकास दिसतात. परीक्षेच्या वेळा वगळता प्रयोगशाळा रिकाम्या असतात. ग्रंथालयात औदासीन्य असते. कोचिंग क्लासेसमध्ये मात्र गर्दी असते. भल्या सकाळपासून रात्रीपर्यंत बॅचेस चालू असतात. या संपूर्ण प्रक्रियेत व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक जडणघडण, सामाजिक जाणीव या गोष्टी मागे पडतात.
Dummy college culture डमी कॉलेज संस्कृती फोफावण्यामागे आर्थिक आणि संस्थात्मक साटेलोटे आहेच. उघड गुपित असे की, अनेक खाजगी क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये अनौपचारिक करार असतात. विद्यार्थी कॉलेजला आला नाही तरी त्याची उपस्थिती लावली जाते, अंतर्गत गुण दिले जातात. काही ठिकाणी तर पालकांना स्पष्ट सांगितले जाते की- ‘‘कॉलेजची चिंता करू नका...आम्ही पाहून घेतो...’’ हे सारे उघडपणे सुरू असते. त्यामुळे शिक्षण विभागाला त्याची माहिती नसते असे म्हणताच येत नाही. परिणाम असा होतो की, मोठा पगार घेणारे शाळा किंवा महाविद्यालयांचे शिक्षक शिकवायला येतात, पण विद्यार्थीच नसतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील जिवंत संवाद आता होत नाही. चर्चासत्रे, वादविवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी संघटना हे सारे जणू चुकीचे होते आणि आता जे सुरू आहे तेच योग्य आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. खरे तर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे सामाजीकरण होते. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, भाषक पृष्ठभूमीचे विद्यार्थी एकत्र येतात. एकमेकांची मते समजून घेतात. नेतृत्व विकसित होते. अनेकांना आयुष्यभराचे मित्र तेथे मिळतात. काहींना स्वतःमधील सुप्त गुणांचा आविष्कार होतो. डमी कॉलेज संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांचे हे संपूर्ण सामाजिक जगच संकुचित झालेले आहे. एक वर्ग संपला की लगेच दुसरी बॅच सुरू होते. शिक्षण कमी आणि उत्पादन प्रक्रिया अधिक. विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य राहिले बाजूला. पुढे येते ते निकालांचे बाजारछाप प्रदर्शन. टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो, मोठे होर्डिंग्ज, जाहिराती इत्यादी. हजारो विद्यार्थ्यांपैकी मोजकी यशस्वी उदाहरणे पुढे करून उर्वरित विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक दबाव तयार केला जातो. अशा जाहिराती पाहून पालकांनाही वाटते की आपल्या मुलाने या शर्यतीत राहिलेच पाहिजे. त्यातून कुटुंबात ताण निर्माण होतो. शिक्षक पूर्वी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच, शिक्षक मंडळी त्यांच्या स्वभावाकडे, अडचणींकडे, मानसिक स्थितीकडे लक्ष देत असत. आता हा व्यवहार शुल्कापुरता मर्यादित झाला आहे. क्लासेस फी घेतात, टेस्ट घेतात आणि निकाल दाखवतात. पालकांना समाधान वाटते की मुलगा ‘‘योग्य ट्रॅकवर’’ आहे. पण तो खरोखर आनंदी आहे का, त्याला काय समजते आहे, त्याचा वैचारिक विकास होतो आहे का, असे सारे प्रश्न कुणालाच पडत नाहीत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणतात त्याप्रमाणे सर्व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करणे आवश्यक आहे यात वाद नाही. विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये येतो की नाही, याची डिजिटल नोंद असली पाहिजे आणि पुरेशी उपस्थिती नसल्यास परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाऊ नये. उपस्थितीचे नियम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलात आले पाहिजेत. मात्र, केवळ तांत्रिक उपायांनी हा प्रश्न सुटणार नाही. शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार हे या समस्येचे महत्त्वाचे कारण आहे. संस्थांच्या व शिक्षकांच्या मान्यतांमध्ये, नियुक्त्यांमध्ये आणि आर्थिक प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी सतत होत असतात. शालार्थ घोटाळ्याचे मुद्दे अजूनही चर्चेत आहेत. ‘नीट’चा पेपर अशाच साट्यालोट्यातून फुटला हेही वास्तव. यात सुधारणा करायची असेल तर शैक्षणिक यंत्रणेचे प्रशासन पारदर्शक करावे लागेल. कोचिंग क्लासेसना नियंत्रणात आणावे लागेल आणि महाविद्यालयांना जबाबदार धरावे लागेल. डमी कॉलेज संस्कृतीचा सर्वांत मोठा तोटा माणूस घडण्याच्या प्रक्रियेत होत आहे. आपण आता सुधारलो नाही तर पुढील काही वर्षांत आपल्याकडे सामाजिक समज अत्यल्प असलेली पिढी तयार होईल. शिक्षणाची चर्चा झाली की लगेच गुण, रँक, पर्सेंटाईल, कट-ऑफ, सिलेक्शन या गोष्टी सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. पालकांपासून संस्थांपर्यंत सर्वांचे लक्ष केवळ निकालांवर केंद्रित झाले आहे.
कोचिंग क्लासेसचे ध्येयच मर्यादित असते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देणे एवढेच त्यांचे काम. त्यामुळे तेथे शिकवण्याची पद्धतही तशीच असते. वेग, तंत्र, शॉर्टकट, ट्रिक्स, प्रश्नांचा पॅटर्न, वेळ व्यवस्थापन या गोष्टींवर भर असतो. पण, ही तांत्रिक बाजू म्हणजे शिक्षणाचा केवळ एक भाग आहे, संपूर्ण शिक्षण नव्हे. शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षणाचा गाभा वेगळा असतो. वर्गात एखाद्या मुद्यावर चर्चा होते, विद्यार्थी त्यात सहभागी होतात, वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. ही प्रक्रिया व्यक्तिमत्त्व घडवणारी असते. विद्यार्थी विचार करायला शिकतो. समाजात मतभेद असतात, विविधता असते, अनेकदा संघर्षही असतो हे त्याला महाविद्यालयाच्या वर्गात समजते. Dummy college culture डमी कॉलेज संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांचे हे नैसर्गिक सामाजिक शिक्षण संपत चालले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत कोचिंग क्लासेसमध्ये बसणारा विद्यार्थी फक्त स्पर्धात्मक जगात वावरतो. त्याच्या आयुष्याचे ध्येय रँक हेच बनते. तो सतत तुलना, स्पर्धा आणि दडपण यांच्या वातावरणात जगतो. याउलट, महाविद्यालयीन वातावरण विद्यार्थ्याला समाजाची ओळख करून देते. ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी शहरातील वास्तव पाहतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलांना संघर्ष करणाèया विद्यार्थ्यांचे आयुष्य समजते. वेगवेगळे समुदाय, भाषा, विचारसरणी, संस्कृती यांचा परिचय होतो. काही जण पहिल्यांदा सार्वजनिक मंचावर बोलतात. काहींना नाटक, साहित्य, संगीत, राजकारण, सामाजिक कार्य यांची आवड तेथे गवसते. अनेकांना स्वतःची ओळखच कॉलेजमध्ये मिळते. कोचिंग क्लासेस यातले काहीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांची रचना परिपक्व माणूस घडवण्यासाठी नव्हे जास्तीचे गुण देण्यासाठीच असते. कॉलेजमधील निवांत चर्चा, ग्रंथालयात बसून वाचन, मित्रांशी मतभेद-चर्चा, शिक्षकांशी संवाद या गोष्टी आता वेळ वाया घालविणाèया मानल्या जाऊ लागल्या आहेत. प्रत्येक मिनिटाचा आर्थिक आणि स्पर्धात्मक हिशेब लावला जातो. ही मानसिकता धोकादायक आहे. शेवटी समाजाला फक्त भरपूर गुण घेऊन बाहेर पडणारे युवक नको असतात. समाजाला विचार करणारे, प्रश्न विचारणारे, संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले नागरिक लागतात. अशी माणसे कोचिंग क्लासेसमध्ये तयार होत नाहीत. त्यासाठी जिवंत वातावरण असलेली महाविद्यालयेच हवीत. या विषयाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आता महाविद्यालयांची जागा कोचिंग क्लासेसने घेतलेली आहे. महाविद्यालये फक्त नावापुरती उरली आहेत. हा संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव आहे. हा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला पाहिजे. आपली शिक्षण व्यवस्था संचालित करणाऱ्यांच्या जिव्हारी तो अद्याप लागला नसेल तर शिक्षणाचा गाडा लवकरच चिखलात रुतेल हे सांगण्यासाठी भविष्यवेत्ता नको.