गोवंश तस्करांवर जिल्हयातील पहिली मकोका कारवाई

63 गोवंशाची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या आवळया मुसक्या

    दिनांक :25-May-2026
Total Views |
चंद्रपूर, 
First Makoka action against cattle smugglers चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे अवैध गोवंश तस्करी करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील कुख्यात गोवंश तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध अत्यंत कडक मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश तस्करी करणार्‍या टोळीवर मकोका लावण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 6 एप्रिल 2026 रोजी रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना मूल ते चंद्रपूर मार्गावरून तेलंगणा राज्याकडे दोन मोठ्या ट्रकमध्ये अत्यंत क्रूरपणे जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि दोन संशयित ट्रक अडवून तपासणी केली. त्या ट्रकांमध्ये एकूण 63 गोवंश (गाय-बैल) अत्यंत निर्दयतेने आणि दाटीवाटीने कोंबले होती. यातील दोन जनावरे मृतावस्थेत आढळली.
 
 
 

jadi 
 
आरोपीकडे पशुधन विकास अधिकार्‍यांचे वाहतूक प्रमाणपत्र किंवा आरटीओचा जनावरे वाहतूक परवाना, अशी कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. आरोपींनी संगनमत करून या गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात अवैध चोरटी वाहतूक चालविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपींविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टोळीप्रमुख इमान बब्बु शेख व त्याचे साथीदार हे पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात या टोळीविरुद्ध संघटितपणे अवैध गोवंश तस्करीचे एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने वैयक्तिक आणि टोळीच्या माध्यमातून सातत्याने संघटित गुन्हेगारी केल्याचे निष्पन्न झाले असून, न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनाने तात्काळ मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला गेला.
 
 
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी 25 मे 2026 रोजी कलम 23(1) (अ) अन्वये या ऐतिहासिक प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली. त्यानुसार या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1) (2), 3 (2), 3 (4) ही कडक वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. गोवंश तस्करांवर मकोका लावण्याची ही चंद्रपूर पोलिस दलाच्या इतिहासातील पहिलीच मोठी कारवाई आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षकईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी (चंद्रपूर) प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोलिस उप निरीक्षक सुरेंद्र उपरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण खारकर, परवरीश शेख, सुधीर मत्ते आदींनी केली.