बुलढाणा,
Five people die in Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. राजुरा धरण परिसरातील एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण विदर्भ हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून संतप्त झालेल्या वडिलांनी आधी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मृत व्यक्तीची ओळख विजय मुसा किराडिया अशी असून ते जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील रहिवासी होते. या घटनेत प्रित, प्राची, पूर्वी आणि पियुष या चार निष्पाप मुलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, विजय किराडिया यांच्या पत्नी काल घरगुती वादानंतर माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर गावाकडे परतताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी घरात काम करत असताना त्यांच्या वडिलांनी पत्नीबद्दल विचारणा केली होती. त्यातून पुन्हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.यानंतर विजय किराडिया आपल्या चारही मुलांना घेऊन राजुरा धरण परिसरात गेले. तेथे त्यांनी मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. घरगुती कलह आणि मानसिक तणावातून ही घटना घडल्याची शक्यता तपासली जात आहे.