गडचिरोली
Gadchiroli bat deaths राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अमरावतीत उष्माघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेमुळे 500 हून अधिक वटवाघुळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा मृत्यू झाल्याने वनविभागासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उष्णतेचा तडाखा माणसांसह वन्यजीव आणि पक्ष्यांनाही सहन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. सिरोंचा वनविभागाच्या हद्दीत असलेल्या एका चिंचेच्या झाडावर अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वटवाघुळांचे वास्तव्याला आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या 20 ते 22 वर्षांपासून या झाडावर वटवाघळांचा कायम मुक्काम असतो. त्यामुळे परिसरात हे झाड ‘वटवाघळांचा अड्डा’ म्हणून ओळखले जाते.मात्र यंदाच्या भीषण उष्णतेने या पक्ष्यांनाही मोठा फटका बसला आहे. वाढत्या तापमानामुळे शेकडो वटवाघळांचा मृत्यू झाला. झाडाखाली मोठ्या प्रमाणात वटवाघुळ मृतावस्थेत पडलेली दिसून आली, तर काही वटवाघुळ झाडावरच मृत अवस्थेत लटकलेली होती. जंगल परिसरातून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताचGadchiroli bat deaths वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वटवाघुळांमुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याने ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून सर्व मृत वटवाघळांना पुरण्यात आले. उष्णतेमुळेच हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गांसह प्रमुख रस्तेही दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत. उष्णतेच्या भीषण लाटेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून दुपारी एक वाजताच उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातही तापमान 46 अंशांच्या पुढे नोंदवले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, तापमानातील सातत्याने होणारी वाढ आणि हवामानातील बदल यांचा परिणाम वन्यजीवांवर गंभीर स्वरूपात होत आहे. गडचिरोलीतील ही घटना पर्यावरणीय असंतुलनाचा गंभीर इशारा मानली जात असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही ती चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.