धर्मशाळा
Gill's smile in front of Virat धर्मशाळातील एचपीसीए स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग क्वालिफायर-१ सामन्यापूर्वी एक खास क्षण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यातील मैत्रीपूर्ण संवादाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू सराव सत्रात व्यस्त असताना हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये शुभमन गिल हा आरसीबीचा उपकर्णधार जितेश शर्मा याच्यासोबत गप्पा मारताना दिसतो. त्याचवेळी खांद्यावर काळी बॅग घेत विराट कोहली मैदानात येताना दिसतो. विराटला पाहताच गिल त्याच्याकडे जातो आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतात.
यानंतर विराटने आपल्या नेहमीच्या खोडकर शैलीत शुभमनच्या दाढीवरून हात फिरवत त्याचे गाल ओढले. हा क्युट क्षण पाहून मैदानावरील खेळाडूंसह चाहत्यांनाही हसू आवरता आले नाही. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, विराट आणि गिलमधील खास बॉन्डिंगची चर्चा रंगली आहे. दरम्यान, आजचा सामना केवळ दोन बलाढ्य संघांमधील लढत नाही, तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीलाही अधिक रंगत आणणारा ठरणार आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात १४ सामन्यांत ५५७ धावा करत एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे शुभमन गिल ६१६ धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.