अतिक्रमणधारकांना नगर परिषदेचे अल्टीमेटम

3 जून पर्यंत अतिक्रमण काढण्याचे आवाहन

    दिनांक :25-May-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia encroachment गोंदिया शहरातील प्रमुख मार्गावरील असलेले अतिक्रमण डोकेदुखी ठरत असून रहदारीस अडथळे निर्माण होत आहे. परिणामी अपघाताची शक्यताही बळावली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाकडून येत्या 3 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार आहे. तेव्हा सर्व संबंधितांनी रस्त्यावर असलेले आपले अतिक्रमण स्वयंखर्चाने काढून रस्ता मोकळा करावा असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून संबंधिताना करण्यात आले आहे. शहरात वाढत असलेले अतिमक्रमण चिंतेची बाब असताना शहरातील प्रमुख मार्गावर झालेले अतिक्रमण शहराच्या विद्रुपीकरणाचे कारण ठरत आहे. त्यात दरदिवशी अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
 
 
ffy68
 
 
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाकडून सर्व अतिक्रमण धारकांना 3 जूनपर्यंत अतिक्रमण काढण्याबाबतचे नोटीस जारी करण्यात आले आहे. अन्यथा नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल व त्यासाठी संबंधित अतिक्रमण धारकांना कोणतीही पुर्वसूचना देण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात शहरातील जयस्तंभ चौक ते नगर परिषद कार्यालय, गोरेलाल चौक ते नेहरु चौक, जयस्तंभ चौक ते एलआयसी चौक, स्टेडियम समोरील, अवंतीबाई चौक ते साई मंदिर, नेहरु चौक ते सिव्हील लाईन, कालेखा कंपनी ते रेल्वे स्टेशन मालधक्का, लोहा लाईन, चना लाईन, पोलिस ठाण्यासमोरील प्रितम चौक या भागातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे नगर परिषदेकडून सुचित करण्यात आले आहे.