राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कारांचा भव्य सोहळा; ६६ मान्यवरांचा होणार गौरव

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली ,
padma awards ceremony देशातील सर्वोच्च पहिल्या नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचा भव्य सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपती भवनाच्या रिपब्लिक पॅव्हेलियनमध्ये आयोजित कार्यक्रमात ६६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करणार आहेत. या विशेष सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

padma awards ceremony 
 
 
यावर्षीच्या नागरी पुरस्कार सोहळ्यात दोन जणांना पद्मविभूषण, सहा जणांना पद्मभूषण आणि तब्बल ५८ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कला, साहित्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, समाजकार्य, विज्ञान, उद्योग आणि सार्वजनिक जीवन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पद्म पुरस्कारामध्ये विदर्भातून नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण वन आणि अमरावतीचे गुरुकुल मोझरीचे बोपचे गुरुजी यांचा समावेश आहे 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वरित पद्म पुरस्कार पुढील एका स्वतंत्र सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रपतींनी २०२६ सालासाठी एकूण १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली असून त्यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, समाजासाठी मोलाचे योगदान देऊनही प्रकाशझोतात न आलेल्या ४५ ‘अनामिक वीरां’नाही यंदा पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सामान्य भारतीयांच्या असामान्य कार्याचा सन्मान करण्याची परंपरा या माध्यमातून कायम ठेवण्यात आली आहे.