अति उष्णतेचा संत्रा, केळी बागांवर परिणाम

कोट्यावधी रुपयांचे नुकसान

    दिनांक :25-May-2026
Total Views |
अंजनगाव सुर्जी,
Heat Impacts Orange and Banana हवामानातील प्रचंड उष्णतेचा संत्रा, केळी बागांवर मोठा परिणाम झाला असून त्यामुळे संत्रा, केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने याबाबत पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की, विदर्भात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा संत्रा, केळी, लिंबू या बागांवर गंभीर परिणाम झाला असून प्रखर सूर्यप्रकाशामुळे संत्र्याची झाडे, फळे, पाने मोठ्या प्रमाणात करपली आहेत. संत्र्याच्या लहान- लहान फळावर परिणाम झाला असून झाडाच्या शेंड्यांची वाढ मंद झाली आहे. प्रचंड उष्णतेमुळे संत्रा झाडावर फळांची प्रचंड गळण सुरू झाल्याने झाडावर मालच शिल्लक राहिल्या नसल्यागत स्थिती झाली आहे.
 
 
orange
 
 
अति उष्णतेमुळे संत्र्याच्या लहान लहान फळांवर सनबर्न होऊन एका बाजूला फळे पिवळे पडून त्यावर काळे डाग येऊन ती फळे सुद्धा अति उष्णतेने गळून पडलीत. या प्रचंड उष्णतेमुळे आंब्या बहार पूर्णपणे गळून पडल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. केवळ २० टक्के माल झाडावर कसाबसा असल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. तर केळीच्या बागांवर सुद्धा अति उष्णतेचा परिणाम झाला असून केळीच्या घडांची वाढ खुंटली आहे. अति उष्णतेमुळे पाने करपली, पिवळेपणा येऊन झाडाची वाढ मंदावली, त्याचप्रमाणे केळीच्या उत्पादनावर सुद्धा याचा मोठा परिणाम झाल्याचे केळी उत्पादक शेतकरी प्रवीण नेमाडे यांनी सांगितले.
 
 
शासन दरबारी प्रश्न मांडणार
-विदर्भात आलेल्या अति उष्णतेच्या लाटेमुळे संत्रा, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्रा बागेत तर आंबिया बहार पूर्णपणे गळून पडल्यागत गंभीर स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हा महत्त्वाचा शेतकर्‍यांचा प्रश्न मी शासन दरबारी मांडणार आहे. शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने नुकसानग्रस्त संत्रा, केळी पिकाचे पंचनामे करावे, असेही निर्देश देण्यात येतील.
- आ. गजानन लवटे