मार्कडादेव मंदिर परिसर विकासाची उच्चस्तरीय पाहणी

राज्य मुख्य सचिवांचे सल्लागार प्रतिक भावी, सहाय्यक रिसीकांत शिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट

    दिनांक :25-May-2026
Total Views |
गडचिरोली,
Markandadev Temple चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कडादेव मंदिर समूह परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी नुकतीच एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय पाहणी संपन्न झाली. राज्याचे मुख्य सचिव यांचे सल्लागार प्रतिक भावी व सहाय्यक सल्लागार रिसीकांत शिर्के यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने मंदिर परिसर, पर्यटन विकासाच्या संभाव्य जागा तसेच प्रस्तावित पुलाच्या बांधकाम स्थळाची सखोल पाहणी केली.
 
 
Markandadev Temple
 
यावेळी चामोर्शीचे नायब तहसिलदार नरोटे, मंडळ अधिकारी सचिन मडावी, मार्कंडादेवचे तलाठी निलेश चंदनखेडे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे सेवानिवृत्त तज्ज्ञ छबिलदास नारायण सुरपाम आदी मान्यवर उपस्थित होते. मार्कडादेव मंदिर हे गडचिरोली जिल्ह्यातील एक प्राचीन व पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. Markandadev Temple या परिसराला पर्यटन नकाशावर ठळकपणे आणण्यासाठी शासन स्तरावर विकासाचे नियोजन सुरू असून या दौर्‍याचा मुख्य उद्देश मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, जतन व संवर्धन याबाबत आढावा घेणे, भाविक व पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या शक्यतांचा आढावा व मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रस्तावित पुलाच्या बांधकामाच्या प्रगतीची व स्थळाची पाहणी हा होता.
 
 
छबिलदास सुरपाम यांची या पाहणीतील उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंदिराचे प्राचीन वास्तुशिल्प व शिलालेखांचे जतन करताना विकासकामे कशाप्रकारे करावीत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पुरातत्त्वीय वारसा जपत आधुनिक सोयीसुविधा उभारण्याचा समतोल साधणे हे या प्रकल्पातील मुख्य आव्हान असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. Markandadev Temple नायब तहसीलदार सचिन मडावी, मंडळ अधिकारी व तलाठी निलेश चंदनखेडे यांनी जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे, मोजमाप व प्रशासकीय बाबींची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर सादर केली. स्थानिक प्रशासनाने या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शवली असून या भागातील आदिवासी समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 
 
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जात असला तरी येथील नैसर्गिक सौंदर्य, आदिवासी संस्कृती आणि ऐतिहासिक मंदिरे यांचा विचार करता हा भाग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रचंड संभाव्यता बाळगतो. Markandadev Temple या पाहणीनंतर संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच विकासाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या समन्वयाने हा प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.