बंगालमध्ये घुसखोरांसाठी ‘होल्डिंग सेंटर’चा नवा फंडा

    दिनांक :25-May-2026
Total Views |
कोलकाता,
Holding Centers in Bengal पश्चिम बंगाल सरकारने सीमापार घुसखोरी आणि परदेशी नागरिकांच्या हकालपट्टी प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘होल्डिंग सेंटर’ अर्थात तात्पुरती सुरक्षित निवास केंद्रे उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली आहे. राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर अवघ्या दोन दिवसांतच लालगोला येथे पहिले सक्रिय होल्डिंग सेंटर सुरू करण्यात आले. लालगोला येथील ‘पद्मा भवन’च्या तिसऱ्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या या केंद्रात तीन बांगलादेशी नागरिकांना ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 

Holding Centers 
सुरक्षेच्या कारणास्तव या तिघांची ओळख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ते सर्व पुरुष असून त्यांचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.राज्य सरकारच्या नियमानुसार या केंद्रांमध्ये तीन प्रकारच्या परदेशी नागरिकांना ठेवले जाणार आहे. सीमारेषा ओलांडून भारतात बेकायदेशीर प्रवेश करताना पकडले गेलेले घुसखोर, विविध गुन्ह्यांमध्ये अटक झालेले आणि सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असलेले परदेशी कैदी, तसेच शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यार्पणाची प्रक्रिया रखडल्यामुळे तुरुंगाबाहेर न सोडता येणारे परदेशी नागरिक यांचा यात समावेश असेल.
 
 
यापूर्वी अशा कैद्यांना तुरुंगात ठेवले जात होते किंवा न्यायालयीन सुनावण्यांसाठी वारंवार हलवावे लागत होते. मात्र आता त्यांना थेट या होल्डिंग सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याने सुरक्षा आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सीमावर्ती भागांमध्ये वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.