नवी दिल्ली,
Indian Sportsperson at Padma Award राष्ट्रपती भवनात झालेल्या पद्म पुरस्कार २०२६ सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला असून भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांचाही पद्मश्री पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विविध क्रीडा प्रकारांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही या सन्मानाने गौरविण्यात आले.

हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेटला नवा इतिहास मिळवून दिला आहे. तिने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मोठे यश मिळवून देत जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. पद्मश्री स्वीकारल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. हरमनप्रीतने आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजारो धावा करत भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.दुसरीकडे, प्रवीण कुमार यांनी पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि २०२० च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून त्यांनी देशाचे नाव उंचावले आहे. जागतिक आणि आशियाई पातळीवरील स्पर्धांमध्येही त्यांनी सातत्याने पदकांची कमाई केली आहे.
या सोहळ्यात एकूण अनेक खेळाडूंना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सविता पुनिया, बलदेव सिंग, भगवानदास रिकवाल, के. पधानिवेल आणि मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेले व्लादिमीर मेस्तविरीश्विली यांचाही समावेश होता. याशिवाय माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील या मान्यवरांच्या योगदानाचा गौरव करताना राष्ट्रपती भवनात उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. देशाच्या क्रीडा क्षेत्रात नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला.