विनातिकीट, अनियमित प्रवास व स्वच्छता नियमभंग करणार्यांवर कारवाई
गोंदिया,
Gondia Station प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष नाका तिकीट तपासणी अभियान हाती घेतले असून, गोंदिया रेल्वे स्थानकावर झालेल्या धडक कारवाईत तब्बल 545 प्रकरणांमध्ये 2 लाख 64 हजार 510 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या या व्यापक कारवाईमुळे विनातिकीट व अनियमित प्रवास करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात 21 मे ते 14 जून 2026 या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 22 मे रोजी गोंदिया स्थानकावर सघन नाका तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. Gondia Station या मोहिमेत मंडळ वाणिज्य व्यवस्थापक पी. बी. राव आणि अनिल एल. बागळे यांच्या नेतृत्वाखाली 2 मुख्य तिकीट निरीक्षक, 36 तिकीट तपासणी कर्मचारी, 2 एमटीएस कर्मचारी आणि 2 रेल्वे सुरक्षा बल जवान सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान एकूण 16 रेल्वेगाड्यांमध्ये व्यापक छाननी करण्यात आली. कारवाईदरम्यान विनातिकीट प्रवास करणार्या 236 प्रवाशांकडून 1 लाख 43 हजार 570 रुपये, अनियमित तिकीटावर प्रवास करणार्या 237 प्रकरणांतून 1 लाख 13 हजार 540 रुपये, विनाबुक सामान व इतर 66 प्रकरणांतून 6 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरविणार्या 4 जणांवर तसेच धूम्रपान निषेध नियमाचे उल्लंघन करणार्या 2 प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वैध तिकीट घेण्याचे, स्टेशनमध्ये प्रवेशासाठी प्लॅटफॉर्म तिकीट वापरण्याचे तसेच रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. Gondia Station रेल्वे ही देशाची सार्वजनिक संपत्ती असून तिचे संरक्षण आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.