टोल नाही, फक्त सेवा शुल्क घेणार!

इराणने टोलबाबत भूमिका स्पष्ट केली

    दिनांक :25-May-2026
Total Views |
तेहरान,
Iran clarifies stance on toll अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण चर्चांदरम्यान इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून कोणताही टोल आकारला जाणार नाही. मात्र, तेथे पुरवल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधांसाठी शुल्क घेतले जाईल.इराणने यापूर्वी होर्मुझ परिसरासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची आणि काही ठिकाणी शुल्क आकारणीची योजना जाहीर केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली होती. मात्र आता इराणने “मुक्त व्यापार आणि सुरक्षित वाहतूक” याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 

Iran clarifies stance on toll 
 
सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार
इस्माईल बघाई यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा ही केवळ इराण किंवा ओमानपुरती मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. त्याचवेळी इराण आपल्या सुरक्षेचाही विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. इराण आणि ओमान या दोन्ही देशांना या मार्गाचा वापर सुरक्षित व्यापार आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला ठेवायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, काही शक्तींनी या सामुद्रधुनीचा वापर इराणविरोधी लष्करी कारवायांसाठी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच या भागात सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री ओमान दौऱ्यावर असून, या नव्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
 
 
संघर्ष कमी करण्यावर भर
अमेरिका-इराण संभाव्य कराराबाबत बोलताना बघाई यांनी अमेरिकेच्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. इराण कोणत्याही धमक्यांकडे लक्ष देत नाही, असे सांगत त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये अणुकार्यक्रमापेक्षा संघर्ष कमी करण्यावर अधिक भर असल्याचे म्हटले.या चर्चेत पाकिस्तानव्यतिरिक्त इतर काही देशांचा मध्यस्थ म्हणून समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्याशी संबंधित मुद्द्यांचाही कराराच्या चर्चेत समावेश करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही सोमवारी इराणबाबत मोठे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे. रविवारी करार झाला नसला, तरी त्याला फार मोठा अडथळा मानण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रुबियो यांच्या मते, अमेरिकेने इराणसमोर होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर ठोस वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी येत्या काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.