आयपीएलमधील अपयशामुळे अय्यर अडचणीत!

बीसीसीआयचा कल आता गिलकडे

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Iyer in trouble due to IPL failure भारतीय क्रिकेटमध्ये आगामी टी-२० कर्णधार कोण होणार, याबाबतची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या श्रेयस अय्यरला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सच्या कामगिरीत आलेली घसरण आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात आलेले अपयश यामुळे अय्यरच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सने दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाने सलग विजय मिळवत गुणतालिकेत मजबूत स्थान निर्माण केले होते. काही सामन्यांमध्ये अय्यरच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या शांत स्वभावाचीही प्रशंसा होत होती. त्यामुळे भारतीय टी-२० संघाच्या भविष्यातील कर्णधारपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आले होते.
 

shreyas iyer
 
मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात पंजाब किंग्सची कामगिरी घसरू लागली. सलग पराभवांमुळे संघाची गाडी रुळावरून घसरली आणि अखेर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवूनही राजस्थान रॉयल्सच्या विजयामुळे पंजाबचा प्लेऑफचा मार्ग बंद झाला. परिणामी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर फेकला गेला.या अपयशाचा फटका आता थेट श्रेयस अय्यरच्या भारतीय संघातील नेतृत्वाच्या दाव्यावर बसताना दिसत आहे. एकीकडे पंजाब किंग्सचे जेतेपदाचे स्वप्न तुटले, तर दुसरीकडे भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी त्यांची पकडही कमकुवत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
 
दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल या शर्यतीत आघाडीवर आल्याचे मानले जात आहे. गिलने आपल्या नेतृत्वाखाली संघाला प्लेऑफमध्ये नेले असून फलंदाजीतही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या हंगामात ६०० हून अधिक धावा करत त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही मजबूत स्थान निर्माण केले आहे. सूर्यकुमार यादव फार काळ भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे संकेत मिळत असताना, भविष्यातील कर्णधार म्हणून शुभमन गिलचे नाव अधिक जोरात पुढे येत आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी मालिकांसाठी कोणावर विश्वास दाखवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.