शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल चोरीचा धुमाकूळ

    दिनांक :25-May-2026
Total Views |
जुन्नर (पुणे),
Junnar cable theft जुन्नर तालुका तालुक्यातील हिवरे खुर्द येथील शिर्के मळा आणि वडमळा परिसरात शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल्सवर डल्ला मारल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. हिवदे खुर्द परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
 

Junnar cable theft 
 
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पुष्पावती नदीलगत असलेल्या शेतांमध्ये असलेल्या विद्युत पंपांच्या केबल्स लक्ष्य केल्या. या कारवाईत सुमारे 35 ते 38 शेतकऱ्यांच्या पंपांच्या केबल्स कापून नेण्यात आल्या असून अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याची साधारणतः 100 ते 150 मीटर लांबीची केबल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांचे पंप त्या वेळी सुरू होते, त्यांच्या केबल्सना हात न लावता बंद अवस्थेत असलेल्या पंपांच्या केबल्सच चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली असावी, असा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही साधारण दीड महिन्यांपूर्वी याच भागात अशाच प्रकारची केबल चोरीची घटना घडली होती. मात्र त्या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
या घटनेत नवनाथ मांडे, Junnar cable theft सुरेंद्र येंधे, संपत वायकर, उल्हास येंधे, सुदर्शन अंभूरे, विठ्ठल भोरे, रमेश अंभूरे, पांडुरंग शिर्के, रामदास भोर यांसह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करत आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सरपंच मनीष बर्डे आणि उपसरपंच लक्ष्मण वायकर यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या नुकसानीमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.