नवी दिल्ली,
Letter from Dharmendra Pradhan to all states देशात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नीट-यूजी परीक्षेच्या आयोजनाबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासन प्रमुखांना पत्र लिहून परीक्षा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्याचे आवाहन केले आहे. २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-यूजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सोयीसुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने निर्देश देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात विशेषतः उष्णतेच्या लाटेचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, बसण्याची पुरेशी व्यवस्था, कार्यरत पंखे किंवा कुलर, स्वच्छ शौचालये, सावलीची प्रतीक्षा जागा आणि अखंड वीजपुरवठा यांसारख्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे. गरजेनुसार पोर्टेबल शौचालयांचीही व्यवस्था करण्यास त्यांनी सांगितले आहे.विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थाही योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी सर्व राज्यांनी सहकार्य करावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थापनासाठी राज्य प्रशासनाशी समन्वय साधण्यावर भर दिला असून विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.