संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले

अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra pre-monsoon rain राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, नाशिक, धाराशिव आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. काही ठिकाणी गारपीट झाली तर काही भागांत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर वादळी वाऱ्यामुळे छप्पर कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
 

Maharashtra pre-monsoon rain 
छत्रपती संभाजीनगर येथे दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावताच विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या संरचनेचे छप्पर कोसळले. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानाचा आढावा सुरू केला.नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील विळेगाव थडी येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड शिवनाम सप्ताहालाही वादळी वाऱ्याचा फटका बसला. भाविकांसाठी उभारण्यात आलेला भव्य मंडप जोरदार वाऱ्यामुळे कोसळला. त्याचवेळी झालेल्या पावसामुळे महाप्रसादासाठी सुरू असलेल्या स्वयंपाकाचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे आयोजकांची तारांबळ उडाली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शहरासह परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
 
धाराशिव जिल्ह्यातील Maharashtra pre-monsoon rain उमरगा तालुक्यातील मुरूम आणि दाळींब परिसरातही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर अचानक वातावरण बदलून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.अमरावती शहरातही पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अवघ्या दहा मिनिटांच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना पावसात वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला.दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.