संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये १२ खासदारांना संसद रत्न पुरस्कार

महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
sansad ratna awards 2026 यंदाच्या संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राने विशेष कामगिरी करत देशभरात आपला ठसा उमटवला आहे. संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 12 खासदारांसह चार संसदीय स्थायी समित्यांची 'संसदरत्न पुरस्कार 2026'साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच खासदारांचा समावेश आहे.
 

महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार 
लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या संसदीय कामगिरीच्या आधारे यंदा 10 लोकसभा खासदार आणि दोन राज्यसभा खासदारांची निवड करण्यात आली आहे लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, हेमंत सावरा, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि लोकसभा खासदार स्मिता वाघ यांचा समावेश आहे. यामध्ये दोन महिला खासदारांचाही समावेश असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रासाठी हा विशेष गौरवाचीबाब आहे.
देशभरातून यंदा एकूण १२ खासदार आणि चार संसदीय समित्यांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांसोबत उत्तर प्रदेशचेजगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे यांच्यासह इतर खासदारांचाही गौरव होणार आहे.
संसदेतील प्रश्नोत्तरं, चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयकं, समित्यांमधील योगदान आणि संसदीय कामगिरीच्या विविध निकषांवर आधारित या पुरस्कारांची निवड करण्यात येते. संसद सदस्यांच्या कामगिरीची आकडेवारी पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च तसेच लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाकडून घेतली जाते.
यावर्षी चार संसदीय समित्यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरवण्यात येणार आहे. कृषी समिती, वित्त समिती, ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती तसेच कोळसा आणि खाण समितीचा यात समावेश आहे. या समित्यांनी संसदीय कामकाजात प्रभावी योगदान दिल्याचे ज्युरीने नमूद केले आहे.
संसद रत्न पुरस्काराची स्थापना २०१० मध्ये चेन्नईस्थित प्राइम पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार केली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कार सोहळ्याचे पहिले उद्घाटन स्वतः डॉ. कलाम यांच्या हस्ते झाले होते.
प्राइम पॉइंट फाउंडेशनचे संस्थापक श्रीनिवासन यांनी सांगितले की, ज्येष्ठ पुरस्कार विजेते खासदार, निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेली प्रतिष्ठित ज्युरी विजेत्यांची निवड करते.sansad ratna awards 2026 गेल्या १५ पुरस्कार सोहळ्यांमध्ये खासदार आणि समित्यांना एकूण १४३ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
दरम्यान, संसद रत्न पुरस्कारांचा १६वा सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे पार पडणार असून, याच कार्यक्रमात १५०वा संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांच्या निवडीमुळे राज्याच्या संसदीय कामगिरीची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.