वर्धा,
Malaria in Devwadi and Pardhi Beda कारंजा सारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या देववाडी आणि पारधी बेडा या परिसरात मुंबई येथून कामानिमित गेलेल्या व गावी परतलेल्या नागरिकांमध्ये मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सद्यस्थितीमध्ये ६ रुग्ण मलेरियाने ग्रस्त आढळून आल्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ पावले उचलत या परिसरांमध्ये मलेरिया उद्रेक घोषित केला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी ५ विशेष वैद्यकीय नियंत्रण पथके तयार करून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी दिली. देववाडी व पारधी बेडा येथील काही कुटुंबं मुंबई येथे गेली होती. तिथे ते आजारी पडल्यामुळे ते परत आले. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ६ नागरिकांचे अहवाल मलेरिया पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय देखरेखीखाली औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बाधित क्षेत्रात तातडीने ५ आरोग्य पथके कार्यान्वित करण्यात आली असून या पथकांद्वारे गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण हाऊस- टू- हाऊस ताप असलेल्या रुग्णांचा शोध आणि तात्काळ उपचार केले जात आहेत. घरोघरी जाऊन रत नमुने तपासणी करण्यात येत आहे. गावातील सर्व नागरिकांचे स्क्रिनिंग केले जात असून संशयित रुग्णांचे रताचे नमुने जागीच गोळा करून मलेरिया निदान व उपचाराची गती वाढवण्यात आली आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, अबेटिंग करणे आणि डास प्रतिबंधक औषधांची धूर फवारणी व घरोघरी कीटकनाशक अंतर्गत फवारणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मलेरियावरील आवश्यक गोळ्या आणि इतर वैद्यकीय साधनसामग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे डॉ. बेले यांनी सांगितले.
घरात कोणालाही ताप, थंडी वाजने, उलटी-मळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास असल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी केले आहे. या पथकात अतिरित जिल्हा आरोग्य अधिकारी तथा प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलिनी विखे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनीत झळके यांच्यासह जिल्हास्तरीय साथरोग पथकाने भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजनांचे आदेश दिले. मुंबईवरून परतलेल्या कुटुंबांमुळे संसर्ग झाला असल्याची शंका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी व्यत केली असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.