कोझिकोड,
Married woman drinks acid केरळमधील कोझिकोड येथे एका २४ वर्षीय विवाहित महिलेचा ॲसिड प्यायल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना विद्यानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पनामलम परिसरात घडली असून फातिमत सुफैदा असे मृत महिलेचे नाव आहे. ती चेराल्डुक्कम येथील रहिवासी होती.मिळालेल्या माहितीनुसार, फातिमत सुफैदाने आपल्या सासरच्या घरातच ॲसिड प्राशन केले. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सुफैदाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की, तिचा पती आणि सासू तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ करत होते. तसेच हुंड्याच्या कारणावरून तिच्यावर सातत्याने अत्याचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफैदाने घटनेपूर्वी तिच्या भावाला घरी बोलावले होते आणि ती माहेरी जाण्याच्या तयारीत होती. याच दरम्यान तिचा पती आदिलने तिला घर सोडून गेल्यास पुन्हा परत येऊ नये असे म्हटल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यावेळी सुफैदाच्या पतीने तिचा मोबाईल फोन हिसकावून तो जमिनीवर फेकून फोडल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आदिलला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.