अंजनगाव सुर्जीमध्ये भीषण अग्नितांडव

वृंदावन डेअरी व नियती सोलर जळून खाक

    दिनांक :25-May-2026
Total Views |
अंजनगाव सुर्जी,
Massive Fire Ravages Anjangaon Surji जिल्ह्यात ४५ अंशांच्या अंगाची लाही-लाही करणार्‍या उन्हात नागरिक होरपळत असतानाच अंजनगाव सुर्जी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात भीषण आगीची घटना घडली. सागर बहादुरे यांच्या घरातील वृंदावन दूध डेअरी आणि नियती सोलर एजन्सी या दोन दुकानांना दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत २० ते २२ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहितीनुसार, शेलगाव येथील रहिवासी यश शरद शेवाळे यांच्या वृंदावन दूध डेअरीतील डीप फ्रीजरमध्ये दुपारी १ वाजता शॉर्टसर्किट झाले. प्रचंड उष्णतेमुळे आग क्षणार्धात भडकली आणि संपूर्ण डेअरीला तिने वेढले. डेअरीतील दोन एसी काऊंटर, दोन डीप फ्रीज, फर्निचर, महत्त्वाचे दस्तऐवज आणि दुधाच्या चुकार्‍यायातील ५५ हजार रुपयांची रोकड आगीत भस्मसात झाली. आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील वैभव पेरकर यांच्या नियती सोलर एजन्सीला कवेत घेतले. या दुकानातील सोलर इन्व्हर्टर, कॉपर केबल, अर्थिंग केमिकल, दोन सोलर पॅनल आणि इतर सुमारे १४.५ लाखांचे महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे जळून गेले. आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच दोन्ही दुकाने बेचिराख झाली. तब्बल एक तास उलटूनही अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचले नाही. तोपर्यंत आग आटोक्याबाहेर गेली होती.
 
 

fte 
 
अग्निशमन विभाग पांढरा हत्ती
आग लागताच नागरिकांनी फोन केले, पण पालिकेकडे ड्रायव्हरच उपलब्ध नव्हता. एक ड्रायव्हर नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्या गाडीवर, दुसरा विश्रांतीवर, तिसरा दुसरीकडे गेला होता. रात्रपाळीच्या ड्रायव्हरला बोलावून तासभराने लहान अग्निशामक गाडी पाठवली, तीही घटनास्थळी बंद पडली. संतप्त नागरिकांनीच बादल्या-पाईपने आग विझवली. नंतर अचलपूर पालिकेची गाडी अवघ्या काही मिनिटांत पोहोचली. गर्दीने चालकाला ओढत रोष व्यक्त केल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. आमदार गजानन लवटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांना धीर दिला. आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे व सुयोग खाडे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. तिन्ही चालक अप्रशिक्षित असल्याचीही माहिती समोर आली आहे.