नाशिक
Nashik Central Jail controversy गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या नाशिक शहरात आता पुन्हा एकदा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील तीन अधिकाऱ्यांनी एका सराईत गुन्हेगारासोबत पार्टी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून सात दिवसांत खुलासा मागवण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कारागृहातील अधिकारी हिरालाल भामरे, अशोक मलवाड आणि जगदीश ढुमने हे सराईत गुन्हेगार गौरव मिश्रा याच्यासोबत एका पार्टीत सहभागी असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पार्टी कारागृहाजवळील तुरुंग अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.दरम्यान, हा व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणाचा अहवाल नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. हे तिन्ही अधिकारी 2024 पासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील Nashik Central Jail controversy संबंधित आरोपी गौरव मिश्रा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात 2024 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 21 नोव्हेंबर 2024 रोजी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. तसेच तोतया आयपीएस अधिकारी बनून अनेकांना फसवल्याचेही आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. शहरात लाल दिव्याच्या वाहनासह पोलिस एस्कॉर्टमध्ये फिरल्याच्या घटनांनंतर त्याच्याविरोधात नाशिक पोलिसांत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी चर्चा सुरू असून कारागृह प्रशासनातील शिस्त व सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.