श्रीनगर,
nia raids in kashmir राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने सोमवारी पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित अनेक ठिकाणांवर एकाचवेळी धाडी टाकल्या. मध्य आणि दक्षिण काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संशयितांच्या घरांची कसून झडती घेतली जात आहे.
एनआयएची पथके जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलांच्या मदतीने श्रीनगरमधील लाल बाजार परिसरासह दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शोधमोहीम राबवत आहेत. शोपियान जिल्ह्यातील झैनापोरा भागातील मुलू चित्रगाम येथेही एका संशयिताच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा जमात-ए-इस्लामीशी कथित संबंध असल्याचा संशय आहे. यापूर्वी त्याने शोपियान जिल्ह्याचा अमीर-ए-जमात म्हणूनही काम पाहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याचा जामिया सिराज-उल-उलूम इमाम साहिब या संस्थेशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
एनआयएने शोपियानमधील इमाम साहिब परिसरात असलेल्या जमात-ए-इस्लामीशी संलग्न सिराज-उल-उलूम संस्थेतही तपास मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फुटीरतावादी आणि भारतविरोधी कारवाया सक्रिय करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून एनआयए तपास करत आहे. जमात-ए-इस्लामीच्या माध्यमातून फुटीरतावादी विचारसरणीला चालना दिली जात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा अर्थात यूएपीए अंतर्गत जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीरला पुढील पाच वर्षांसाठी “बेकायदेशीर संघटना” घोषित केले होते.nia raids in kashmir या संघटनेवर दहशतवादाला प्रोत्साहन देणे, फुटीरतावादी विचारसरणीला पाठिंबा देणे आणि राष्ट्रविरोधी कारवायांना खतपाणी घालण्याचे गंभीर आरोप आहेत.
शेवटची माहिती मिळेपर्यंत एनआयएची शोधमोहीम सुरूच होती आणि आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.