समुद्रपूर,
Jam Bus Stand चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळखल्या जाणार्या जाम बसस्थानकावर सध्या प्रवाशांना भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. पारा ४७ अंशाच्या पार गेला असताना बसस्थानकातील पंखे बंद आहेत. पंख्यांअभावी नागरिक व प्रवासी प्रचंड उकाड्याने आणि उष्णतेने त्रस्त झाले आहेत. जाम हे चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना जोडणारे मुख्य जंशन मानले जाते. त्यामुळे या बसस्थानकावर २४ तास प्रवाशांची मोठी वर्दळ असते. महिला, लहान मुले, वृद्ध आणि आजारी प्रवासी येथे बसेसची वाट पाहत तासंतास थांबतात. मात्र, सध्याच्या कडक उन्हात बसस्थानकाच्या आवारात सावली असली तरी पंखे नसल्याने प्रवाशांना घामाच्या धारा सोसाव्या लागत आहेत.

उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता बसस्थानकावर पिण्याचे थंड पाणी आणि पंखे आवश्यक आहेत. मात्र, जाम बसस्थानकावर या मूलभूत सुविधेचाच फज्जा उडाला आहे. Jam Bus Stand काही ठिकाणी पंखेच नाही तर काही ठिकाणी असलेले पंखे केवळ शोभेच्या वस्तू बनून धूळ खात पडून आहे. बसस्थानकाच्या मुख्य प्रतीक्षालयात आणि आवारात तात्काळ नवीन पंखे बसवण्यात यावे, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणार्या या बसस्थानकाची अशी दुरवस्था झाल्याने संताप व्यक्त होत आहे.