पेट्रोल-डिझेल भडकले, १० दिवसात ७ रुपयाने महाग

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
petrol and diesel prices देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, गेल्या दोन आठवड्यांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली. या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर तसेच वाहतूक खर्चावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

petrol and diesel prices 
 
 
नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.20 रुपये प्रतिलिटर झाला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्येही इंधन दरांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. मुंबई, कोलकाता, जयपूर, पटना आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 110 रुपयांच्या पुढे गेले आहेत. डिझेलच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली असून, अनेक शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. यामुळे मालवाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाही भारतीय तेल विपणन कंपन्या जुन्याच दराने इंधन विक्री करत होत्या. मात्र, वाढत्या तोट्यामुळे अखेर दरवाढ करणे अपरिहार्य झाले. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांना दररोज हजारो कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या शनिवारीही पेट्रोलमध्ये 87 पैसे आणि डिझेलमध्ये 91 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याच दिवशी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 1 रुपयांची वाढ करून किंमत 81.09 रुपये करण्यात आली.आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण कडक केल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.