पुणे
flour mill rate hike शहरात महागाईच्या झळांनी आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता दळणाच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर आणखी भार पडणार आहे. शहरातील पीठ गिरणी चालकांच्या संघटनेने 1 जूनपासून दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे गहू, ज्वारी यांसारख्या धान्याचे दळण आता प्रतिकिलो 10 रुपयांनी उपलब्ध होणार आहे. तर डाळ, भाजणी आणि इतर मिश्र धान्यांच्या दळणासाठी प्रतिकिलो 15 रुपये आकारले जाणार आहेत.
सध्या सर्वसाधारण दळणासाठी 8 रुपये प्रतिकिलो दर आकारला जात होता. मात्र वाढती महागाई, गिरणीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, वाढलेले वीजबिल तसेच कामगारांच्या वेतनवाढीच्या मागण्या यांचा परिणाम या निर्णयावर झाल्याचे गिरणी मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत या दरवाढीला अंतिम मान्यता देण्यात आली.या दरवाढीचा थेट परिणाम गृहिणींच्या दैनंदिन खर्चावर होणार असून आधीच गॅस सिलिंडर, खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात आता रोजच्या पोळी-भाकरीसाठी लागणाऱ्या धान्य दळण्याचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.एका मध्यमवर्गीय कुटुंबात महिन्यातून flour mill rate hike अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर धान्य दळले जाते. त्यामुळे या वाढीव दरांमुळे महिन्याचा खर्च लक्षणीय वाढणार असून, उत्पन्न मर्यादित असताना खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याची भावना अनेक कुटुंबांकडून व्यक्त होत आहे. घर चालवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची खंतही गृहिणींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या दरवाढीमुळे केवळ दळण खर्चच नाही तर पुढील काळात इतर जीवनावश्यक सेवांच्या किमतीही वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.