मुंबई,
Rahul Narvekar's instructions to the police विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला विशेष सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. संभाव्य अवैध गोवंश वाहतूक आणि गोवंश हत्येच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून दिले आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असल्याने आगामी बकरी ईददरम्यान काही ठिकाणी अवैध कृत्ये घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः मालेगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूरया भागांमध्ये अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संवेदनशील भागांमध्ये पोलिस गस्त वाढवणे, अवैध जनावर वाहतूक रोखणे आणि गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गोसंरक्षणासाठी काम करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या पत्रानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याची माहिती समोर येत आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त, तपासणी मोहीम आणि वाहतूक नियंत्रणासाठी हालचाली सुरू झाल्याचे पोलिस विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.