नागपूर,
Rain in Wardha and Amravati विदर्भात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा सुरू असताना, दुसरीकडे काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी, विदर्भातीलच काही भागांमध्ये मात्र उष्णतेचा कहर कायम आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आज देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येथे पारा तब्बल ४७.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वर्धा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमान ४५ अंशांवर नोंदवले जात होते. मात्र आज अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. तर अमरावतीमध्येही पाऊस पडल्याने उन्हापासून काही प्रमाणात उसंत मिळाला. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवसांत विदर्भात मान्सूनपूर्व सरींची शक्यता वर्तवली जात असून, काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.