धारणी,
Road Closed by Tiger Reserve Authorities १० वर्षापूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट-धुळघाट-खंडवा रेल्वेमार्ग बंद करण्यात आल्यावरही कोणतीच पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. येथील आदिवासी बारुखेडा मार्गे हिवरखेड-अकोट पोहचत होते. आता मात्र बारुखेडा मार्ग अडवून व्याघ्रने पर्यायी थातूर-मातूर मार्ग दाखवल्याने संतापाची लाट पसरलेली आहे. हा मार्ग बांधकाम विभागाचा असूनही व्याघ्र प्रकल्पाने एकतर्फी कारवाई करून वहिवाटीच्या मूळ अधिकारावर गदा आणलेली आहे. परिसरातील चार ग्रामपंचायती या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धारणी ते अकोट, तेल्हारा, अकोला व शेगाव जाण्यासाठी मीटरगेज रेल्वे लाईन उपयोगी होती. १० वर्षापूर्वी ब्रॉडगेजची परवानगी व्याघ्र प्रकल्पाने दिलेली नव्हती. यामुळे ४० गावांचा संपर्क खंडित झालेला होता. पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी मार्ग पण उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता. बारुखेडा मार्गे वान नदीच्या पुलावरून आदिवासी प्रवास करत होते. आता मात्र, सात दिवसापूर्वी बारुखेडा मार्गावर काटे, लाकडी फाटा टाकून रस्ता अडविण्यात आल्याने लोक संतापलेले आहेत. सध्या एका कोरड्या नाल्यातून कसा-बसा पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे. मात्र पावसाळ्यात तो पण बंद होईल.
भाजपाचे धोंडीबा मुंडे यांनी याविषयी व्याघ्र प्रकल्पाच्या कारवाई विरुद्ध बंड पुकारलेले आहे. कोणत्याही खोदकाम किंवा विकासकामात अडथळा करणार्या व्याघ्र प्रकल्पाने पर्यायी मार्गाची परवानगी कशी घेतली, यावर मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता पावसाळ्यात हिवरखेड मार्ग पूर्णतः बंद होणार आहे. यामुळे राणीगाव, धुळघाट रेल्वे, गोलाई, जामपानी, कंजोलीचे नागरिक सरळ न्यायालयात दाद मागणची शक्यता आहे. विशेष असे की, व्याघ्रने ब्रॉडगेज लाईनची परवानगी नाकारल्यानंतर धारणी-अकोटसाठी दुसरा रस्ता देण्यात आलेला नव्हता. अनेक समस्यांना तोंड देत लोक प्रवास करत होते. आता मात्र, रस्ता बंद केल्याने एकच असंतोष खदखदत आहे.