वेध
सोनाली पवन ठेंगडी
आपल्या देशात जन्म, मरण, लग्न, सणवार अशा क्षणांना अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते. या प्रत्येक क्षणाशी अर्थकारण निगडित आहे. त्यातही लग्न हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असल्याने त्याच्यासोबतची आर्थिक गणितंही बरीच मोठी आहेत. घरात मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या लग्नाचा विषय घरच्यांमध्ये अक्षरश: भिनलेला असतो. मुलीचे शिक्षण नीट झाले पाहिजे, हा विचार आता कुठे समाजात रुजतोय. पण, त्याच्यासोबत लग्नाचा विचार पिच्छा पुरवतोच. मग लग्नासाठी आई-वडिलांकडून सोन्याचा दागिना दिला पाहिजे, ही अघोषित परंपरा पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. अर्थात, दागिना हा एखादा दागिना नसतो. लग्नाची बोलणी करणारे मुलाकडील ‘चतुर’ लोक याला ‘Salankrut Kanyadan’ ‘सालंकृत कन्यादान’ म्हणतात. आम्हाला काही नको, तुम्ही मुलीचे सालंकृत कन्यादान करणारच ना, असे वाक्य ते हमखास फेकून मारतात. मग मुलीकडील बोलणी करणारे म्हणतात, हो-हो, आम्ही यथाशक्ती सालंकृत कन्यादान करूच. या सालंकृत कन्यादान शब्दाचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा लक्षात आले की, त्यात डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व अलंकारांचा समावेश होतो. म्हणजे वडिलांकडून मुलीला इतके सोने मिळणारच आहे. यासाठी मग त्या मुलीच्या वडिलांची काय ससेहोलपट होईल, याची कोणाला तमा नसते. पण, आता काळ बदलला आहे, असे आपण म्हणत असू तर अशा परंपरांमध्येही बदल व्हायलाच हवा. विशेष म्हणजे, मुलाकडच्या मंडळींनी आपल्या होणाऱ्या सुनेला मंगळसूत्रापलीकडे फार काही देणे अपेक्षित नसते. तरीही आजकाल बरेच काही दिले जाते. म्हणजे दोन्ही पक्षांकडून नवरीवर सोन्याची नुसती लयलूट असते. असो. पण, मुळात लग्नात सालंकृत कन्यादान केले नाही तर काय बिघडणार आहे?
यावर काही ‘जाणते’ लोक तर्क सांगतात की, सोने अडल्या-नडल्या वेळी कामी येणार. म्हणून सोने खरेदी करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. मुलीच्या भविष्यातील अडल्या-नडल्या वेळेसाठी सोनेच दिले पाहिजे, ही सक्ती कशाला? तुमच्याकडे पैसा असेल तर तिला एफडी करून द्या. आजकाल गुंतवणुकीच्या हजारो योजना आहेत. त्यातील एखाद्या सरकारी बँकेतील उत्तम योजनेत तिच्या नावाने पैसे गुंतवा. तो पैसा तिला यथावकाश सोपवा आणि तुला जेव्हा खऱ्या अर्थाने गरज पडेल तेव्हाच तो वापर हे सांगून ठेवा. तिच्या मिळकतीतून तिला बचत करायला शिकवा. ही सवय तिच्यावर वाईट वेळ येऊच देणार नाही. त्यासाठीही आजकाल एसआयपी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीपीएफसारख्या असंख्य योजना आहेत. आजकाल तर बहुतांश सरकारेदेखील मुलीच्या जन्मापासून तिच्यासाठी पैशाची तरतूद करून ठेवतात. पण, हा पैसा तिच्या लग्नासाठी म्हणून वापरण्यापेक्षा तिला पायावर उभे करण्यासाठी वापरला जावा. ती आत्मनिर्भर झाली तर तिला भविष्यकाळात सोन्याचीही कमतरता राहणार नाही आणि सोने विकण्याचीही गरज पडणार नाही.
‘Salankrut Kanyadan’ याचाच दुसरा विचार म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षभरात सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. आपण नाहीच खरेदी केले सोने तर काय बिघडणार आहे? काहीही बिघडणार नाही. आपल्या देशाच्या भल्यासाठी त्यांनी केलेले हे आवाहन आपण सहकार्य केले तरच यशस्वी ठरणार आहे. कधीकाळी देशावर अशी वेळ आली होती जेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी लोकांना एक वेळेच्या जेवणाचा त्याग करा, असे आवाहन केले होते. जेव्हा देशाचे नेतृत्व आपल्या नागरिकांना कळकळीने काही गोष्टी सांगत असेल तेव्हा त्याचा सकारात्मक विचार व्हायला हवा. आज जागतिक स्तरावर असणारे वातावरण संघर्ष आणि तणावाचे आहे. अशा स्थितीत देशाची अर्थव्यवस्था सांभाळणे हे फार मोठे आव्हान सरकारसमोर आहे. म्हणून त्यांच्या वतीने या आव्हानाला पेलण्यासाठी आपण त्याचे ‘आवाहन’ अंगीकारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी वाट्टेल त्या इच्छांना आणि अनिष्ट परंपरांना मुरड घालावी लागली तरीही बेहत्तर, पण देशहित सर्वोपरी असावे. मुलीच्या लग्नात तिच्या अंगावर सोन्याचे दागिने नसतील तर बापाला वाईट वाटेल. पण, पुढील काळाच्या दृष्टीने तर समाजाने लग्न व्यवस्थेतून सोन्याच्या दागिन्यांनाच फाटा दिला तर तिच्या जन्मासोबतच तिच्या लग्नाचा खर्च दिसणार नाही आणि पर्यायाने मुलीच्या जन्माचा आनंद द्विगुणित होईल.
7755938822