नागपूर,
Bhagwan Nagar राष्ट्र सेविका समितीच्या वतीने दरवर्षी विविध विभागांमध्ये संस्कार वर्गांचे आयोजन केले जाते. याच अंतर्गत भगवान नगर येथील श्रीराम सभागृहात ७ मेपासून सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचा समारोप १९ मे रोजी उत्साहात पार पडला. या संस्कार वर्गात सुमारे ३० मुले-मुलींचा सहभाग होता. दरम्यान पोत्याची शर्यत, धावण्याची शर्यत, लंगडी तसेच लगोरी, संकल, लंगडी आउट, विषामृत, धापाधूपी आऊट आदी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. तसेच “कोल्ड कुकिंग” उपक्रमांतर्गत मुलांनी गॅसचा वापर न करता सातूचे पीठ, कच्चा चिवडा यांसारखे पारंपरिक पदार्थ तसेच भेळ, सॅन्डविच, टिक्का आणि पापड चाट यांसारखे आधुनिक पदार्थ तयार केले.

याशिवाय मुलांना रद्दी कागदापासून पेपर बॅग बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. या वर्गात प्रसिद्ध जादूगार मोहन झरकर यांचे जादूचे प्रयोगही सादर करण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या वेळी सुखदा पाचपोर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या नागपूर महानगर सहसंपर्क प्रमुख अर्चिता पांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात मुलांनी लघुनाटिका सादर केली. Bhagwan Nagar या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन राधा काळे यांनी केले असून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनही त्यांनीच केले. समारोप कार्यक्रमात ज्योत्स्ना त्रिफळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सौजन्य: डॉ. समृद्धी देशमुख, संपर्क मित्र